चुकीच्या रचनेमुळे अपघातांची संख्या वाढतेय

मंगेश राऊत, नागपूर</strong>

शहरात दिवसेंदिवस अपघातप्रवण स्थळांची संख्या वाढत असून अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघातप्रवण स्थळे कमी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी रस्त्यांची रचना करताना अभियांत्रिकीत सुधारणा करण्याची गरज आहे.

गेल्यावर्षी नागपूर महामार्ग पोलिसांच्या हद्दीत १ हजार १८५ अपघात झाले. त्यात १ हजार १४२ लोकांचा मृत्यू झाला  तर १ हजार १८८ जण जखमी झाले. २०१६ पासून महामार्गावर ३ हजार ५८५ अपघातांमध्ये ३ हजार ६५९ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार दोन जण जखमी झाले. अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे वाढते प्रमाण केवळ महामार्गावरच नाही तर शहरातील रस्त्यांवरही आहे. महापालिका व मेट्रो रिजन परिसरात ४३ अपघातप्रवण स्थळे आहेत. या अपघातप्रवण स्थळांवर दरवर्षी अनेकांचा जीव जातो. पण, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नासुप्र व महापालिकेला जाग काही येत आहे. काही अपघातप्रवण स्थळांची रचनाच चुकीची असल्याचे निष्कर्ष अनेक यंत्रणांनी नोंदवले आहेत. तरीही ते स्थळ अपघातमुक्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून येते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही उपराजधानीत पार पडलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात अभियंते वातानुकूलित कक्षात

बसून रस्त्यांचे नियोजन करतात, अशा शब्दात रस्त्यांची रचना करणाऱ्या अभियंत्यांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतरही अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत बदल झाल्याचे दिसत नाही.

योग्य मार्ग काढण्यात येईल

ऑटोमोटिव्ह चौकात रोटरी असायला हवी. बांधकाम नियमानुसार या ठिकाणी रोटरी निर्माण करण्यासाठी जागा खूप हवी. चौकात जागा कमी आहे. छोटी रोटरी निर्माण केल्यास पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल. या चौकात काय करता येईल, हे बघतोय. तसेच इतर अपघातप्रवण स्थळासंदर्भात त्या-त्या यंत्रणांशी समन्वय साधून योग्य मार्ग काढण्यात येईल.

– विद्याधर सरदेशमुख, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

आठवा मैलमध्ये ‘अंडरपास’ची गरज

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अर्थात अमरावती मार्गावर आठवा मैल परिसरात मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. गेल्या तीन वर्षांत या चौकात ३५ अपघात झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला  तर ३२ जण जखमी झाले. त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे, वाहतूक सिग्नल लावणे, वाहतूक फलक बसवणे, चौकात योग्य प्रकाश व्यवस्थेची गरज आहे

वाडी टी-पॉईंटवर ‘रोटरी’ची मागणी

अमरावती मार्गावरील दुसरे अपघातप्रवण स्थळ म्हणजे वाडी टी-पॉईंट परिसर होय. या ठिकाणी गेल्यावर्षी ५१ अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. या ठिकाणी गतिरोधकाची नितांत गरज आहे. रिफ्लेक्टर, दुभाजक व रस्त्याची किनार रंगवण्यासोबतच झेब्रा क्रॉसिंगची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येथे वाहने वेडीवाकडी वळवण्यात येत असून लोकांची गर्दी अधिक असल्याने टी-पॉईंटवर रोटरी तयार करण्याची मागणी वाहतूक विभागाने केली आहे.

जामठा परिसरातही ‘अंडरपास’ हवे

महामार्ग क्रमांक ७ वर जामठा टी-पॉईंट ते डोंगरगाव दरम्यान परसोडी गावाजवळ अपघातप्रवण स्थळ आहे. या ठिकाणी तीन वर्षांत ५ अपघातांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. या ठिकाणी रस्त्यावर हायमास्क लाईट लावण्याची गरज आहे. वाहतुकीसाठी दिशादर्शक फलक बसवण्यात यावे, ब्लिंकर्स हवेत. महत्त्वाचे म्हणजे, जामठा टी-पॉईंट ते डोंगरगावपर्यंत अंडरपास तयार केल्यास ते स्थळ अपघातप्रवण स्थळातून मुक्त केले जाऊ शकते, अशी विनंती वाहतूक पोलिसांनी केली आहे.