हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

शिक्षण घेऊन मेरिटमध्ये येणे म्हणजे परिपूर्ण नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत की सरासरी गुण मिळवणारे पुढे उत्कृष्ट कारकीर्द घडवतात. मात्र, मेरिटमध्ये येणाऱ्यांना ते शक्य होत नाही. मी वाणिज्यचा विद्यार्थी आहे, विधि आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. मेरिटपासून दूर होतो. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक रस्ते बांधणीचे काम करण्याचा विक्रम माझ्या नावावर जमा असल्याचे स्वानुभव सांगत आजच्या शिक्षणाच्या उपयोजितेवर अनेक चौकार, षटकार मारून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रेक्षकांना हास्यरंगात बुडवले.

लिबरल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. बापुसाहेब हडस यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी लावलेल्या रोपटय़ाचे पु.रा. जोशी यांच्या प्रयत्नांतून आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना गुणवत्ता ढासळली. शिक्षण क्षेत्राचे औद्योगिक धोरण म्हणजे विना-अनुदानित शिक्षण संस्था होत. काळानुरूप परिवर्तन होणे आवश्यक एम्स, ट्रीपल आयटीसारख्या संख्या टीसीएसचे मोठे केंद्र मिहानमध्ये आहे. एचसीएलच्या शिव नागर यांच्याशी चर्चा झाली असून येथे येणाऱ्या कोणत्याही उद्योजकाला ९० टक्के रोजगार विदर्भातील लोकांना मिळायला हवेत असा आग्रह धरीत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता पुण्या-मुंबईवालेही नाराज होत असून सर्व नागपूरलाच नेणार का? असे विचारतात, असेही त्यांनी सांगितले

फडणवीस म्हणाले, कालसुसंगत आव्हाने संस्थेने पेलली पाहिजेत. राज्यातील ६२ हजार शाळा डिजिटलायझेशनमध्ये प्रगत झाल्या असून १८व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. फाल्कन-२००० पुढील चार वर्षांत नागपुरात बनणार आहे. माजी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा सल्ला फडणवीसांनी शाळेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. डॉ. काकोडकरांनीही बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना तयार करण्याचे शिक्षण संस्थांसमोर आव्हान असल्याचे भाषणात स्पष्ट केले.

निम्न ध्येय हा गुन्हा असल्याचे अनेक भाषणातून गडकरी यांनी सांगितले आहे. त्याची पुनरावृत्ती याहीवेळी करून त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हडस हायस्कूलची केवळ रंगरंगोटी न करता तीन तारांकित शाळा उभारण्यासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून निधी मिळवण्याचा सल्ला दिला. नदी जोड किंवा गंगा नदीशी संबंधित कामांसाठी मी उद्योजकांना भीकच मागितली असून सरकारी पैशातून ते काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.