परिवहन खात्याकडून अद्याप एकही सूचना नाही

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : टाळेबंदी शिथिल होताच राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे (आरटीओ) कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे नागपूरसह राज्यातील काही शहरात ड्रायव्हिंग स्कूल सुरू तर काही शहरात बंद आहेत. परंतु अद्यापही परिवहन खात्याने ड्रायव्हिंग स्कूल सूरू करण्यासह वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देताना घ्यायच्या काळजीबाबत एकही सूचना काढली नाही. त्यामुळे  गोंधळाचे चित्र कायम आहे.

टाळेबंदी लागल्यावर  ड्रायव्हिंग स्कूलमध्ये  प्रशिक्षणासाठी पैसे भरलेल्यांचे प्रशिक्षण अर्धवट राहिले. यापैकी अनेकांचे शिकाऊ व कायम परवान्याचे कामही प्रलंबित आहेत. टाळेबंदी  शिथिल होताच परिवहन खात्याने आरटीओतील परवान्यांसह इतरही कामे सुरू केली. परंतु ड्रायव्हिंग स्कूल सुरू वा बंद ठेवण्याबाबत एकही सूचना काढली नाही. दरम्यान, वाहन परवाना मिळत असल्याचे बघत नागपूरसह पूर्व विदर्भात ड्रायव्हिंग स्कूल सुरू पुन्हा झाले. या स्कूलच्या वाहनांद्वारे विविध आरटीओ कार्यालयांत परवान्याबाबत  चाचणीही दिली जात आहे. परंतु सूचना नसतानाही  अनेक शहरांत वाहन चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. पुण्यासह काही शहरात मात्र अद्यापही प्रशिक्षण सुरू झाले नाही. वाहन शिकताना प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक अगदी आजूबाजूला बसतात. अशा स्थितीत संक्रमण टाळण्यासाठीच्या सूचना तातडीने काढणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना संक्रमणाचा धोका वाढू शकतो.

संक्रमण टाळण्यासाठी कोणते उपक्रम सुरू वा बंद करावे, हे शासनावर अवलंबून आहे. वाहन परवाने देणे सुरू झाल्यावर ड्रायव्हिंग स्कूलशी संबंधितांना परवाने देण्याची अडचण दूर झाली आहे. परंतु वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देताना उमेदवार व शिक्षक जवळजवळ बसतात. संक्रमणाचा धोका बघता पुढे आवश्यक खबरदारीसह शासन योग्य निर्णय घेईल.

– शेखर चन्न्ो, परिवहन आयुक्त, मुंबई.

ट्रान्सपोर्ट वाहन चालकांचा पेच!

ट्रान्सपोर्ट व जड वाहन चालवणाऱ्या चालकांना परवाना नूतनीकरण करताना नवीन मोटार वाहन कायद्यानुसार एक दिवस ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याचे प्रमाणपत्र अर्ज क्रमांक ५ ‘अ’मध्ये जोडल्यावरच नूतनीकरण होते. त्यामुळे सध्या त्यांना ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रमाणपत्र घेताना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.