टाळेबंदी असेपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची सक्ती करू नका, असे आदेश देशभरातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणाखाली देशभरातील आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, एम.बी.ए., एम.सी.ए., औषधशास्त्र, हॉटेल, अप्लाइड आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट या अभ्यासक्रमांची जवळपास १० हजार ८९७ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात सुमारे ३२ लाख ८४ हजार ४१७ विद्यार्थी शिकतात. शिवाय ५ लाख ६२ हजार ६२५ प्राध्यापक आणि इतकेच शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या महिन्याभरापासून देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आता ३ मेपर्यंत टाळेबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच महाविद्यालये बंद आहेत. परंतु, काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

झाले काय?

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना शुल्काची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी ‘एआयसीटीई’कडे येत आहे. त्यामुळे ‘एआयसीटीई’ने पत्र काढून देशभरातील सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून टाळेबंदीदरम्यान शुल्काची वसुली करू नये, असे आदेश दिले आहे. या पत्रात महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित पगार देण्याची सूचना केली आहे.