News Flash

कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रियेची व्यवस्थाच नाही

शहरात सुमारे १ हजार ते १२०० टन कचरा जमा होतो. भांडेवाडीत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो

(संग्रहित छायाचित्र)

महापालिका दरवर्षी ५० कोटींचा खर्च करते

महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळे करण्यासाठी घरोघरी दोन स्वतंत्र डबे दिले तसेच शहरातील विविध भागातही ओला आणि सुका कचऱ्याचेही दोन स्वतंत्र डबे बसविण्यात आले. कचरा संकलनावर दरवर्षी ५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, परंतु ओला आणि सुका कचऱ्यावरील स्वतंत्र प्रक्रियेबाबत मात्र महापालिका प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नाही.

स्वच्छतेमध्ये नागपूर शहराचा क्रमांक घसरल्यानंतर महापालिका प्रशासनाने साडेसहा हजार नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळे करण्यासाठी दोन डबे दिले. मात्र, महापालिकेची डबघाईस आलेली आर्थिक स्थिती आणि लोकांची डबे विकत घेण्याची मानसिकता नसल्यामुळे घरोघरी डबे देण्याची योजना बारगळली. त्यानंतर शहरातील विविध भागातील पदपथांवर किंवा इतरही वर्दळीच्या ठिकाणी ओला, सुका कचऱ्याच्या संकलनासाठी १ हजार २०० डबे बसविले. याचे काम वैद्य अ‍ॅन्ड कंपनीने केले, त्यासाठी कंपनीला ५ कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे घरोघरी जमा होणारा ओला आणि सुका कचरा या डब्यांमध्ये टाकला जाईल, अशी अपेक्षा होती मात्र, शहरातील अनेक भागात हे डबे कचऱ्याने भरलेले दिसतात तर काही ठिकाणी ते चक्क गायब झाले आहेत. ‘कनक सर्व्हिसेस’ या कंपनीकडे शहरातील विविध भागातील कचरा संकलनाची जबाबदारी आहे. मात्र, दररोज डब्यामधून कचरा काढला जात नाही.

शहरात सुमारे १ हजार ते १२०० टन कचरा जमा होतो. भांडेवाडीत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो, परंतु हा ओला, सुका कचरा साठवण्यासाठी भांडेवाडीमध्ये स्वतंत्र व्यवस्था नाही. ‘एंजर’ या खासगी कंपनीकडे ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यापासून हे काम बंद करण्यात आले असल्याने भांडेवाडीत मोठय़ा प्रमाणात कचरा साचला आहे.

भांडेवाडीत खत तयार होतेय

शहरात ओला आणि सुका कचरा संकलनासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे.  इंदूरच्या धर्तीवर त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याच्या प्रक्रियेचे काम सुरू असून हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे.

– डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) महापालिका

ओला आणि सुका कचऱ्याचे डबे

मध्य नागपूर – २१०

पूर्व नागपूर – १६०

उत्तर नागपूर – १२५

दक्षिण नागपूर – २३५

दक्षिण-पश्चिम नागपूर – १८५

पश्चिम नागपूर – २१५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2018 2:19 am

Web Title: no separate mechanism for the waste
Next Stories
1 खासगी पाळणाघराकडे महिलांचा कल !
2 गडचिरोली जिल्ह्य़ात मनरेगात कोटय़वधींचा भ्रष्टाचार
3 विजेच्या स्थिर आकार शुल्कात एक वर्षांत ५० टक्के वाढ
Just Now!
X