किशोर जिचकार यांचा स्वीकृत सदस्यत्वाचा मार्ग मोकळा

महापालिकेत काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत सदस्यत्व मिळवण्यासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे तानाजी वनवेंच्या शिफारशीवरून अर्ज करणारे किशोर जिचकार यांचा स्वीकृत सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल हा माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे गटाला मोठा धक्का देणारा आहे.

महापालिकेत काँग्रेस पक्षातर्फे स्वीकृत सदस्यत्व मिळवण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. काल, बुधवारी न्यायालयाने महापालिका आयुक्त, महापौर, प्रदेश काँग्रेस, संजय महाकाळकर, तानाजी वनवे आणि किशोर जिचकार यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर सर्व पक्षांतर्फे वकील उच्च न्यायालयात हजर झाले.

विकास ठाकरे यांनी स्वीकृत सदस्यपदाच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वनवे यांना काँग्रेसने गटनेता म्हणून मान्यता दिली नसल्याने त्यांना या पदासाठी सदस्याची शिफारस करण्याचे अधिकार नाहीत. शिवाय वनवे यांना १९ मे २०१७ ला विभागीय आयुक्तांनी गटनेता म्हणून जाहीर केले. त्यामुळे स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे १८ मे २०१७ पर्यंत महाकाळकरच गटनेता होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीनुसार आपण केलेला स्वीकृत सदस्याचा अर्ज ग्राह्य़ धरावा. मात्र, महापालिकेच्या उद्या, १५ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत केवळ जिचकार यांच्या अर्जावरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आपल्याला काँग्रेसचे स्वीकृत सदस्य म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती ठाकरे यांनी केली. त्यावर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्टला दिलेल्या गटनेता व विरोधी पक्षनेते पदाच्या वादावर निकालाचा आधार घेऊन विकास ठाकरेंची याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, वनवेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर, महाकाळतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस.के. मिश्रा, जिचकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस.जी. भांगडे, महापालिकेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी.एस. कप्तान आणि काँग्रेस पक्षातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

या कारणांमुळे ठाकरेंना धक्का

स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १८ मे २०१७ ही होती. शेवटच्या दिवशी महाकाळकर यांच्या शिफारशीनुसार विकास ठाकरे आणि वनवे यांच्या शिफारशीवर किशोर जिचकार यांनी अर्ज भरले. वनवे यांना १९ मे २०१७ ला विभागीय आयुक्तांनी गटनेता म्हणून मान्यता दिली. त्यामुळे अर्ज भरतेवेळी महाकाळकर गटनेते होते, असा दावा ठाकरे यांनी केला. त्याला तानाजी वनवे यांनी विरोध केला. गटनेता बदलण्याचा ठराव १६ मे रोजी झाला. त्याला विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी मान्यता दिली, परंतु गटनेता बदलण्याची प्रक्रिया १६ पासूनच करण्यात आल्याने विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर त्याची अंमलबजावणी १६ मे पासूनच होईल, हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य़ धरला. १९ मे रोजी जरी मान्यता मिळाली असली तरी गटनेता बदल हा १६ मे रोजी झाल्याने वनवे यांच्या शिफारशीनुसार जिचकार यांनी दाखल केलेला अर्ज पात्र आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.