* दोन वर्षांत केवळ ३३० तक्रारी * सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांची माहिती

पुरोगामी आणि सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रात संगणक साक्षरतेवर अधिक काम करण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या ई-तक्रार आडकेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ई-तक्रार सुविधेचा शुभारंभ होऊन दोन वर्षे उलटली असून आतापर्यंत पोलिसांकडे ३३० ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या. पोलिसांच्या आंतरराज्यीय परिषदेला उपस्थिती दर्शविल्यानंतर सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी ही आकडेवारी सांगितली.

देशात सर्वाधिक नागरीकरण महाराष्ट्राचे झाले आहे. शिवाय राज्यातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा इतर राज्याच्या तुलनेत चांगला आहे. प्रत्येकाच्या घरी मोबाईल आणि इंटरनेट सुविधा आहे. त्यामुळे २४ जुलै २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीएनएस अंतर्गत ई-तक्रार (ऑनलाईन तक्रार) करण्याच्या सुविधेचा पुणे येथून शुभारंभ केला. पहिली ई-तक्रार नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी या सुविधेकडे पाठ फिरवली.

गेल्या दोन वर्षांत राज्यभरात केवळ ३३० ई-तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सिंघल यांनी दिली. ई-तक्रारीनंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलविल्या जाऊ शकते. मात्र, अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांकडून स्वीकारण्यात येत नाही, अशी नागरिक तक्रार करतात. अशावेळी नागरिक ई-तक्रार करू शकतात. त्यांना ऑनलाईन शिक्का मिळतो. त्यामुळे त्यांनी तक्रार केली होती, याचा नागरिकांजवळ पुरावा असतो.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी तपासतात, गुन्हा दाखल करण्यायोग्य असेल, तर तक्रारदारास संपर्क करून ठाण्यात बोलवितात. या सुविधेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सिंघल यांनी दिली.

दरवर्षी साडेचार लाख गुन्हे

दरवर्षी राज्यात ४ लाख ते ४.५० लाख गुन्हे घडतात. सीआयडीच्या २०१५ च्या अहवालानुसार राज्यात ४ लाख २३ हजार गुन्ह्य़ांची नोंद झाली. त्यापैकी भादंवि अंतर्गत २ लाख ७५ हजार गुन्हे होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुन्हे घडत असताना ई-तक्रारीचे प्रमाण ३३० असणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांनी ठाण्यातच जाऊन तक्रार दाखल करण्यापेक्षा ई-तक्रार सुविधेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.