|| राम भाकरे

सर्वाधिक पाच उमेदवार काँग्रेसचे : – राजकारणात नवीन लोकांनी यावे, असे आवाहन अनेक राजकीय पक्ष करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र उमेदवारी देताना जुन्या शिलेदारांनाच पुढे केले जाते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे थोडे बदललेले दिसले. परिणामी, विदर्भातील ६२ मतदार संघात पहिल्याच लढाईत मैदान मारणारे १६ नवीन चेहरे विधानसभेत पोहोचले. यात सर्वाधिक ५ उमेदवार काँग्रेसचे असून त्यात शहरातील विकास ठाकरे व जिल्ह्य़ातील राजू पारवे यांचा समावेश आहे.

पक्षाच्या व्यूहरचनेला मतदारांनी साथ देत या नवीन उमेदवारांना पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवण्याची संधी दिली आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली मतदारसंघातून भाजपच्या श्वेता महाले, बुलढाणा मतदारसंघातून शिवेनेचे संजय गायकवाड आणि मलकापूर मतदारसंघातून काँग्रेसचे राजेश एकाडे यांनी विजय मिळवला. अकोला जिल्ह्य़ात दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे, धामनगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे प्रताप अडसड, मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार, नागपूरच्या पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विकास ठाकरे तर उमरेड

मतदार संघातून राजू पारवे, भंडारा- गोंदिया जिल्ह्य़ातून तुमसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून मनोहर चंद्रिकापुरे, गोंदियामधून भाजपचे बंडखोर विनोद अग्रवाल, चंद्रपूर जिल्ह्य़ात चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार, वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर व यवतमाळ जिल्ह्य़ात पुसदमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक या नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, या नवनिर्वाचित आमदारांनी अनिल बोंडे, राजकुमार बडोले, चैनसुख संचेती, गोपालदास अग्रवाल, नीलय नाईक, संजय देवतळे, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, वीरेंद्र जगताप, चरण वाघमारे या ज्येष्ठ नेत्यांचा पराभव केला आहे.

१८ महिलांमध्ये एकच विजयी

विदर्भातील विविध मतदारसंघात १८ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यात केवळ वरोरा मतदार संघातून प्रथमच खासदार झालेले बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी विजयश्री गाठली.