19 September 2020

News Flash

लोकशाहीत मोजक्याच लोकांनी निर्णय घेणे हानिकारक

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका; केंद्र व राज्य सरकारवर नाराजी

भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका; केंद्र व राज्य सरकारवर नाराजी

लोकशाहीत सामूहिक निर्णय प्रक्रियेला महत्त्व असते. हल्ली केंद्र व राज्य सरकारकडून सर्व निर्णय लादले जात असून सरकारमधील मोजकेच लोक निर्णय घेत आहेत. ही बाब लोकशाहीला हानिकारक आहे, अशी टीका माजी खासदार व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

भारताचे शेजारच्या अनेक राष्ट्रांसोबत संबंध चांगले नाहीत. देशातील विविध जाती, धर्मात तेढ वाढण्याचा परिणामही शेजारी राष्ट्रांवर होतो आहे. त्याचे अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास नेपाळमधील भूकंपाचे देता येईल. भारत व नेपाळमध्ये ९० टक्के धर्म एक असल्यावरही तेथील भूकंपादरम्यान देशातून मदतीकरिता गेलेल्या अनेकांना परत पाठवण्यात आले. या लोकांनी उपकाराची भाषा वापरल्यामुळे असे झाले. मानवतेची भाषा वापरणाऱ्यांची त्यांनी मदत घेतली. सीबीएसईच्या पुस्तकात कट्टर नक्षलसमर्थक किशनजीच्या धडय़ाचे अप्रत्यक्ष समर्थन करीत अ‍ॅड. आंबेडकरांनी विद्यार्थ्यांनाच स्वातंत्र्यानंतरच्या चळवळींच्या कोणता अभ्यासक्रम घ्यावा, याचा अधिकार असायला हवा, असे मत व्यक्त केले. त्यामुळे चुकीच्या ऐवजी अधिकृत माहिती विद्यार्थ्यांला मिळेल. मात्र लेखकाने त्याच्या लेखणीशी प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा विसर

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना हे चांगले अभियान सुरू केले होते. ते हयात असेपर्यंत त्याची अंमलबजावणीही झाली, परंतु विद्यमान सरकारला त्याचा विसर पडला. पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानाचा संदेश दिला असला तरी राज्य शासनाला या अभियानाचा विसर पडला, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

तुकडोजी महाराजांवर चित्रपट काढण्याची मागणी

देशात सगळ्यांना एकत्र जोडण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याची गरज आहे. त्याकरिता शासनाने तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट काढावा, अशी सूचना करताना याकरिता मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. श्री गुरुदेव सेवा आश्रमचे हरिभाऊ वेरुळकर यांनी याप्रसंगी तुकडोजी महाराजांच्या कार्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा, कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य गाव गणराज्य पुरस्कार जाहीर करावा यांसह विविध मागण्या केल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:39 am

Web Title: prakash ambedkar on democracy sant gadge baba gram swachata abhiyan
Next Stories
1 स्वच्छतेत नागपूर घसरले
2 महापालिकेला प्रकल्प व्यवस्थापनाचा पुरस्कार
3 जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपींना वाचवायचे आहे का?
Just Now!
X