गडकरींच्या निर्देशांकडे दुर्लक्ष

हौशी संस्थासह सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी रेशीमबाग परिसरातील अतिशय सुसज्ज अशा सुरेश भट सभागृहाचे भाडे केवळ पाच हजार रुपये ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहाचे भाडे केवळ पाच हजार रुपये घेण्याबाबतचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. परंतु आता गडकरींच्या  निर्देशांकडे दुर्लक्ष करून सभागृहाचे भाडे वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

सभागृहाची मालकी महापालिकेची राहणार असली तरी देखभाल व व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृहातील वाहनतळ व्यवस्था सुद्धा महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेवकांच्या संस्थेला देण्यात आली आहे. शहरातील हौशी व सामाजिक संस्थांना शहरातील अन्य सभागृहांचे भाडे परवडण्यासारखे नसल्यामुळे अनेक संस्था कार्यक्रमांचे आयोजन करीत नव्हत्या.

महापालिकेच्या सुरेश भट सभागृहाची निर्मिती झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने  हौशी व सामाजिक संस्थांना केवळ पाच हजार रुपयात ते उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.  गेल्या दीड वर्षांत अनेक संस्थांना त्याचा लाभ झाला.

मात्र आता महापालिकेची आर्थिक स्थिती आणि सभागृहाचा खर्च बघता भाडे वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. हौशी, सामाजिक संस्थांसाठी १० हजार रुपये  तर व्यावसायिक संस्थांसाठी २५ ते हजार ४० हजारापर्यंत शुल्क घेण्यात यावे, असा हा प्रस्ताव आहे. पुढील महिन्यात स्थायी समिती समोर हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

भाडे वाढवण्याचा  प्रस्ताव असला तरी त्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. शहरातील हौशी संस्थांना सध्या पाच हजार रुपयातच ते उपलब्ध करून दिले जात आहे. भाडे वाढवण्याचा निर्णय स्थायी समिती आणि त्यानंतर सभागृहात होईल.

– प्रदीप पोहोणे, अध्यक्ष,  स्थायी समिती.