केवळ ५६ इमारतींमध्ये  ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा एक प्रयोग म्हणून महापालिकेने प्रत्येक इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले खरे, पण ही योजना सुद्धा इतर योजनांप्रमाणेच अपयशी ठरली आणि यंदाच्या पावसाळ्यातील पाणीही पूर्वीप्रमाणेच वाहून गेले.

पाणी अडवा-पाणी जिरवा योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक इमारत आणि निवासी गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी अडवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ साठी शासनाने २८ ऑगस्ट २००९ रोजी  अधिसूचना काढली होती.

मात्र, महापालिकेने त्याची अमंलबजावणी केली नसल्याने पुन्हा २३ मार्च २०११ ला दुसरी अधिसूचना काढली. शासनाने तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे.

पावसाचे वाहून जाणारे पाणी  साठवून ठेवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, त्याची अंमलबजावणीच होत नाही. ३०लाख लोखसंख्येच्या नागपूर शहरात दरवर्षी शेकडो इमारती उभ्या राहतात मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोजक्याच ठिकाणी सोय असते. महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे म्दोन वर्षांत केवळ ५६ इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरात दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. जुन्या आणि नवीन शहरातील विहिरी उन्हाळ्यात आटतात. त्यामुळे टँकरने  पाणी पुरवठा करावा लागतो. याच भागात पावसाचे पाणी अडवून ते जिरवण्याची सोय नाही. नागरिकही ही बाब गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते.

तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक आहे. विभागातर्फे मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम झाले की नाही याची नियमित पाहणी केली जाते. अनेकदा मंजूर अंतर्गत बदल केले जाते. बांधकामात सर्व नियमांचे पालन झाल्यावरच आम्ही भोगवटा प्रमाणपत्र देतो.

– प्र.भा.गावंडे, सहाय्यक संचालक नगर रचना, मनपा.