News Flash

पावसाच्या रौद्र रूपाचे दर्शन

पूर्व मोसमी पावसाने मंगळवारी ऐन मृग नक्षत्रावर शहरात जोरदार हजेरी लावली.

सोसाटयाचा वारा, विजांचा गडगडाट

नागपूर : पूर्व मोसमी पावसाने मंगळवारी ऐन मृग नक्षत्रावर शहरात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना धडकी भरवली. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा तासाभराच्या पावसाने शहरातील वृक्ष मोठय़ा संख्येने कोसळले.

सकाळी पावसाची कोणतीही चिन्हे नसताना दुपारी एक वाजताच्या सुमारास आभाळात ढगांची एकच गर्दी झाली. अवघ्या काही क्षणातच ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध दूर के ल्यानंतर शहरातील बाजारपेठ सोमवारपासून सुरू झाली. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले. अचानक आलेल्या पावसामुळे ते दुकानातच अडकले तर काही आडोसा शोधण्याआधीच ओलेचिंब झाले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मेडिकल चौकासह शहरातील इतरही रस्ते पाण्याने तुडुंब भरले. हवामान खात्याने आठ जूनपासूनच विदर्भात पावसाची शक्यता तर नऊ जूननंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, तत्पूर्वीच उपराजधानीला पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. आंब्याचा शेवटचा बहर देखील या पावसाने भूईसपाट झाला. अनेक ठिकाणी जमिनीवर आंब्याचा सडा पडला होता. महापालिके च्या अग्निशमन विभागाला झाडे पडल्याचे १३ दूरध्वनी आले. तर सायंकाळी सातपर्यंत सुमारे ५७ झाडे उचलण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच तासाभराच्या पावसाने झालेल्या पडझडीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. तर वाहतूक पोलिसांनीही धावून जात रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्यास पुढाकार घेतला. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार आगमनानंतर या आठवडय़ाच्या अखेरीस मोसमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शहरातील हिरवळीला फटका

शहरात गेल्या काही दिवसांपासून अजनीवनातील वृक्षतोडीविरुद्ध विविध माध्यमातून विरोध दर्शवला जात असतानाच निसर्गाच्या रौद्ररूपाचा फटका शहरातील वृक्षांना बसला. शहराच्या विविध भागात सुमारे शंभराहून अधिक लहानमोठे वृक्ष कोसळले. माटे चौकातील डोमिनोजसमोर असलेला मोठा वृक्ष कोसळला. फांदी अंगावर पडल्याने एकजण जखमी झाला. दीक्षाभूमीसमोरील मोठे झाड कोसळल्याने दीक्षाभूमी ते चित्रकला महाविद्यालयाच्या मधला रस्ता बंद झाला. सिव्हिल लाईन्स परिसरातही मोठय़ा संख्येने झाडे कोसळली. अंबाझरी ते माटे चौक, सुभाषनगर ते हिंगणा या मार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. गांधीनगर परिसरात रस्त्यावर झाडे पडल्याने आत जाणारे मार्ग बंद झाले.

झोपडय़ाचे छप्पर उडाले

काही दिवसांपूर्वीच उद्म्घाटन झालेल्या मेट्रोच्या धरमपेठ महाविद्यालय स्थानकालादेखील वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका बसला. या स्थानकावर अंबाझरी तलावाच्या बाजूने असलेले विदेशी बनावटीचे छप्पर(टीना) उडाले.  व्हीएनआयटी परिसरात असलेल्या एका सभागृहाजवळ काही कामगारांनी उभारलेल्या झोपडय़ांवरील टीनाच्या छप्परावर देखील झाडे पडली.

विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे पितळ उघडे

परीक्षा, निकालातील उणिवांसाठी कायम चर्चेत असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले. आज मंगळवारी आलेल्या पावसाने इमारतीमध्ये करण्यात आलेल्या ‘पीओपी’चा भाग खचला. विशेष म्हणजे, या इमारतीमध्ये लहान मुलांसाठी करोना केंद्र बनवण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. वर्षभराआधी विद्यापीठाच्या या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. एका वर्षांतच इमारतीच्या अनेक भागात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम  निकृष्ट  झाल्याचा आरोप होत होता. मंगळवारच्या पावसाने ते स्पष्ट  झाले. बजाज समूहाने सामाजिक दायित्व करारातून या इमारतीसाठी पंधरा कोटींची मदत केली होती. असे असतानाही विद्यापीठ दर्जेदार इमारत बनवू शकले नाही, असा आरोप आता होत आहे. पाऊस आणि सोसाटय़ाचा वारा सुरू होताच इमारतीच्या ‘पीओपी’चा भाग पडायला सुरुवात झाली. यामुळे कुणालाही इजा झाली नसली तरी यामुळे बांधकामातील उणिवा समोर आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:20 am

Web Title: rainstorm the thunder lightning nagpur ssh 93
Next Stories
1 ऑनलाईन कार्यक्रमावर तब्बल पावणेचार कोटींचा खर्च
2 पहिलाच दिवस गर्दीचा!
3 शहरातील करोनाग्रस्तांची संख्या दोन आकडी!
Just Now!
X