28 October 2020

News Flash

विद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका

सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने होणार परीक्षा

सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने होणार परीक्षा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असणारे ‘आरटीएमएनयू परीक्षा अ‍ॅप’चे विमोचन केले असून विद्यार्थ्यांना गुगल प्लेस्टोरमधून हे डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ओळखपत्रावर युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. परीक्षेदरम्यान इंटरनेटची जोडणी बंद झाल्यासही विद्यार्थ्यांना एका तासात पेपर पूर्ण करून इंटरनेटची जोडणी उपलब्ध झाल्यास तीन तासांच्या आत तो सबमिट करता येणार आल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली. विशेष म्हणजे, ५० पैकी केवळ २५ प्रश्न सोडवायचे असून यासाठी ऋणात्मक गुण नसल्याने विद्यापीठाने परीक्षेची काठीण्य पातळी पुन्हा सोपी केली आहे.

विद्यापीठाची अंतिम वर्षांची परीक्षा १ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. सुट्टीच्या दिवशीही परीक्षा होणार असून ४ ऑक्टोबरला युपीएससीची परीक्षा असल्याने या दिवशीचा पेपर १९ ऑक्टोबरला होणार आहे. प्रत्येक विषयासाठी ५० गुणांची परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना यासाठी ५० प्रश्न दिले जाणार आहेत.

एका तासात यातील २५ प्रश्न सोडवायचे असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण राहणार आहे. ऋणात्मक गुण नसल्याने अधिकचे प्रश्न सोडवण्याची मुभा देण्यात आली आहे.

परीक्षेसाठी १ लाख ६४ हजार २१० प्रश्न तयार झाले असून त्याचे नियमनाचे कामही पूर्णत्वास आल्याचे कुलगुरू यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते.

मदत केंद्राशी संपर्काचे आवाहन

थोडाही नेटवर्क असला तरी विद्यार्थ्यांना अ‍ॅपवर पेपर उपलब्ध होणार आहे. पेपर एकदा मोबाईलवर सुरू झाल्यास मध्ये इंटरनेट बंद झाले तरी विद्यार्थ्यांना एक तास  पेपर सोडवता येणार आहे. पेपर पूर्ण झाल्यावरही इंटरनेटची जोडणी न मिळाल्यास तीन तासांत पेपर सबमिट करता येणार आहे. यानंतरही इंटरनेट जोडणीची समस्या असल्यास विद्यापीठाच्या मदत केंद्राला संपर्क केल्यास विद्यार्थ्यांची समस्या दूर केली जाईल. त्यामुळे इंटरनेटचा जोडणीचा धोका नाही, असे आश्वासन परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

असा करा अ‍ॅपचा उपयोग

अ‍ॅप डाऊनलोड करून झाल्यावर त्यात मुख्य परीक्षा या पर्यायावर जायचे आहे. त्यानंतर ओळखपत्रामध्ये दिलेला युजर आयडी आणि पासवर्ड घालून परीक्षेला सामोरे जाता येणार आहे. यानंतर परीक्षेच्या वेळेवरच विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिका येणार आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची नोंदणी विद्यापीठाकडे होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरप्रकाराचा मार्ग अवलंबू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 1:53 am

Web Title: rashtrasant tukadoji maharaj nagpur university mobile app ready zws 70
Next Stories
1 वनखात्यातील महत्त्वाची फळी रिक्त पदांमुळे खिळखिळी
2 सेवा हक्क आयोगाकडील निम्म्या तक्रारींवर विलंबाने कार्यवाही
3 अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुण
Just Now!
X