बदलत्या वातावरणाचा संकेत म्हणजेच मान्सूनची नांदी देणारा ‘मृगाचा काळा किडा’ आणि ‘गोसावी’ या दोन्ही कीटकांवर बदलत्या वातावरणानेच परिणाम केला असून गेल्या दहा वर्षांत या दोन्ही कीटकांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. केवळ बदलते वातावरणच नाही तर रासायनिक खतांचा वापर आणि सिमेंटीकरणही या कीटकांचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे मान्सूनचा संकेत देणारा कीटक धोक्यात आला आहे.
पावसाळयातला पहिला पाऊस अवकाळी की मान्सून हे ओळखण्यासाठी हवामान खातेही अपयशी ठरत असतानाच मृगाचा काळा किडा आणि गोसावी हे दोन्ही कीटक मान्सूनच्या आगमनाची नांदी देत होते. जमिनीवर या किडय़ांचे अस्तित्त्व दिसले म्हणजेच मान्सूनचा अंदाज शेतकरी लावत होते आणि त्यानुसार खरिपाच्या पेरणीला सुरुवात होत होती. मृगाची सुरुवात होताच ग्रामीण भागात काळा किडा दिसतो आणि त्यावरून मृगाचा पाऊस असल्याचा नैसर्गिक संकेत शेतकऱ्यांना मिळतो. अवकाळी पाऊस आणि मृगाचा पास यातला फरकसुद्धा या कीटकसृष्टीतून जाणवतो. त्याचबरोबर मृगाच्या पहिल्या पावसानंतर ओल्या मातीवर चालणारा भगव्या रंगाचा आणि धोक्याचा स्पर्श होताच पाय मिटवून चेंडूसारखा गोल बसणारा रेड वेलवेट माईट म्हणजेच गोसावी हा सुद्धा मान्सूनचा संकेत देतो. मात्र, गेल्या दहा वषार्ंत निसर्गाचे सूचक असलेले हे कीटक जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहेत. बेभरवश्याचा व कधीही पडणारा पाऊस, वाढते तापमान, रासायनिक खते व कीटकनाशकांचा शेतावर होणारा वापर आणि मातीवर होणारे सिमेंटीकरण या गोष्टी हे कीटक संपण्यास कारणीभूत ठरत आहेत. कुजलेल्या पानांचे बारीक कण आणि लहान सूक्ष्मजीव हे यांचे खाद्य आहे. पावसाळी हंगामापुरते आपले अस्तित्त्व दाखवणाऱ्या या कीटकांचे अस्तित्त्व आता पावसाळयातल्या चार महिन्यातही दिसून येत नाही. पक्षी, साप, सरडे यांच्या प्रजननकाळात हे कीटक महत्त्वाचे ठरतात. मात्र, त्यांचेच अस्तित्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यावर अवलंबून असणारे इतरही घटक कमी होण्याची भीती आहे.

परिसंस्थेतील अन्नजाळयात कीटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पक्षी, साप, सरडे यांचे ते मुख्य खाद्य आहेत. अन्नसाखळी समृद्ध असेल तरच जैवविविधता समृद्ध राहते. रसायने व वाढता कीटकनाशकांचा वापर जैवविविधतेसाठी जीवघेणा ठरला आहे. वन्यप्राण्यांची गणना वनखात्याकडून केली जाते. या कीटकांची गणना होऊ शकत नसली तरीही त्यांच्या अस्तित्त्वाचा आणि नष्ट होण्यामागील कारणांचा शोध घेतला तर हे मान्सूनचे सूचक वाचतील.
– यादव तरटे पाटील, निसर्ग अभ्यासक