News Flash

दुचाकी इथेनॉलवर चालवा नितीन गडकरी यांचे आवाहन

पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर शंभरच्या पुढे गेल्याने केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी ६० रुपये प्रतिलिटर इथेनॉलवर दुचाकी चालवण्याचा सल्ला दिला आहे.

नागपूर : पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर शंभरच्या पुढे गेल्याने केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी ६० रुपये प्रतिलिटर इथेनॉलवर दुचाकी चालवण्याचा सल्ला दिला आहे. नागपुरात लवकरच इथनॉल पेट्रोल पंप सुरु करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

सदर येथील उड्डाण पुलाखालील सौंदर्यीकरणाचे उद्घाटन त्यांनी शुक्रवारी केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार नागो गाणार, अंजुमन महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, मी २००९ पासून इथेनॉलबद्दल सांगत आहे. आज पेट्रोलचे दर वाढले आहेत.  इथेनॉल प्रतिलिटर ६० रुपये आहे. पेट्रोलच्या दुचाकीला लहान फिल्टर लावल्यास इथेनॉलवर दुचाकी चालते. पेट्रोलची आवश्यकता नाही. करोनाच्या काळात कलाकारांच्या हाताला काम नव्हते. अशावेळी सदर उड्डाण पुलाखाली ३.५ किलोमीटरचे सौंदर्यीकरण त्यांनी केले. त्यांना रोजगार मिळाला. अशाच प्रकारे कामठी रोडवरील मेट्रोच्या पुलाखाली व  पारडी पुलावर देखील इतिहास लिहिण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले.

आता प्राणवायू बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही

करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या बाधितांमुळे विविध रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात प्राणवायू सिलेंडर बाहेरून मागवण्यात आले. मात्र आता प्राणवायू निर्मितीत नागपूर हळूहळू स्वयंपूर्ण होत आहे. जिल्’ात अनेक नवीन प्राणवायू निर्मिती केंद्र सुरू होण्याच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आता आपल्याला बाहेरून प्राणवायू आणण्याची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शुक्रवारी पूर्व नागपुरातील पारडी येथील भवानी रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

गडकरी वाहतूक कोंडीत अडकले!

पारडी परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण करून छोटय़ा विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून काहींनी बांधकाम केले आहे. त्यामुळे येथे दिवसभर वाहतूक खोळंबा होऊन नागरिकांना त्याचा त्रास होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्याचा अनुभव आला. गडकरी शुक्रवारी दुपारी पारडी परिसरातील भवानी रुग्णालयात प्राणवायू निर्मिती केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी जात असताना पारडी भागात वाहनांची गर्दी होऊन त्यात गडकरी यांच्या गाडय़ांचा ताफा अडकला. ही वाहतूक कोंडी बघून गडकरी चक्क गाडीतून उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांची त्यांनी मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 1:00 am

Web Title: ride bike ethanol appeal of nitin gadkari ssh 93
Next Stories
1 ताडोबातील गावांच्या पुनर्वसनासंदर्भात सरकारला नोटीस
2 इतर मागास बहुजन कल्याण विभाग ‘विनाकर्मचारी’
3 इतर मागास बहुजन कल्याण विभाग ‘विनाकर्मचारी’