News Flash

‘देशभक्तीसाठी संघाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही’

विरोध करणाऱ्यांनीच नेहमी खरा भारत नाकारला

डॉ. मनमोहन वैद्य (संग्रहित छायाचित्र)

सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी तिरंग्याला वंदन केले नाही, या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून प्रतिक्रिया उमटली आहे. देशभक्तीसाठी आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. सत्ता असेपर्यंतच संघातील लोकांची देशाशी बांधिलकी राहील, असे वक्तव्य राहुल गांधींनी एका कार्यक्रमात केले होते.
यावर वैद्य म्हणाले की, संघाचे अनेक स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. काहींना फाशीदेखील झाली. हेडगेवारदेखील जंगल सत्याग्रहात सहभागी झाले होते. संघ प्रत्यक्ष सहभागी झाला नाही, पण स्वयंसेवक सहभागी झाले होते. समाजाला संघटित करण्यावर संघाचा विश्वास आहे. संघाला विरोध करणाऱ्यांना समाज नाकारत असून, संघाची स्वीकारार्हता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांनीच नेहमी खरा भारत नाकारला असून, त्यांच्याकडून आम्हाला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

राहुल गांधी यांनी गुरूवारी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात संघावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील दृष्टीकोन सांगितला. हा देश आमचा आहे, तुम्ही या देशाचे नाहीत, ही संघाची विचारसरणी आहे, असे ते म्हणाले. संघाच्या विचारसरणीने निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे माहिती असल्यामुळेच महत्त्वाच्या ठिकाणी संघाच्या विचारसरणीची वर्णी लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. एवढेच नाही तर संघाला देशाची घटना बदलायची आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 8:40 pm

Web Title: rss leader manmohan vaidya react congress rahul gandhi speech in delhi
टॅग : Congress,Rss
Next Stories
1 गो-पालकांची यादी सादर करा
2 लोकजागर : मेळघाट कधी बदलणार?
3 विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा संकल्प मोडीत
Just Now!
X