भाजप नेत्यांसह ३५ संघटनांचे १५०० प्रतिनिधींची सभेला उपस्थिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिखर संस्था अ.भा. प्रतिनिधी सभेच्या बैठकीला उद्या शुक्रवारी ९ मार्चपासून नागपुरात सुरुवात होत आहे. तीन दिवसीय बैठकीत संघाशी संबंधित ३५ संघटनाचे १५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहे. या प्रतिनिधी सभेत दोन नव्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संघाच्या रचनेनुसार ४५ प्रांत असून अखिल भारतीय प्रतिनिधी, क्षेत्रीय प्रचारक, माजी प्रांत प्रचारक, ६ सेवा विभागांचे प्रांत प्रमुख, प्रांतस्तराचे कार्यकर्ते, निवडक प्रतिनिधी आणि संघाच्या इतर ३५ संघटनांच्या प्रतिनिधींसह सुमारे १५०० प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे.

संघाशी संबंधित ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होऊन त्यांच्या कार्याचा अहवाल सादर करतील. भाजपची भूमिका काय राहील हे पक्षाचे नेते सांगणार आहेत, असे वैद्य यांनी सांगितले.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या प्रतिनिधी सभेत सहकार्यवाहची नियुक्ती केली जाते. यावेळी  सहकार्यवाह बदलणार आहे का, असे विचारले असता १० मार्चला प्रतिनिधी सभेत सर्वसंमतीने निर्णय होईल, असे वैद्य म्हणाले.

दरम्यान, प्रतिनिधी सभेची तयारी जोमात सुरू झाली असून संघाचे आणि विविध संघटनांचे अधिकारी नागपुरात दाखल होत आहेत.

प्रतिनिधी सभेसाठी येणाऱ्या विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवासाच्या व्यवस्थेपासून ते बैठकीचे स्थान, भोजनाची व्यवस्था, अधिकाऱ्यांना रेल्वे आणि विमानतळापासून बैठक स्थळी आणण्यापर्यंत सर्व व्यवस्थेची जबाबदारी स्वयंसेवकांकडे देण्यात आली आहे.

भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच, राष्ट्र सेविका समिती, दीनदयाल शोध संस्थान  या प्रमुख संस्थांचे कार्यकर्ते या निमित्ताने कामाला लागले आहेत. दत्तोपंत ठेंगडी सभागृह आणि महर्षी व्यास सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठकी होणार असल्याने तेथे स्वयंसेवक आणि अन्य लोकांना प्रवेश राहणार नाही. संघाचे स्थानिक स्वयंसेवक परिसरात सर्व व्यवस्था पाहणार आहेत. स्मृती मंदिर परिसरात दोन शामियाने उभारण्यात आले आहे.

शिवाय, रेशीमबाग मैदानावर शामियाना उभारण्यात आला आहे. परिसरातील एका शामियान्यात प्रसार माध्यमांसाठी व्यवस्था राहणार आहे. सभेसाठी संघाचे प्रमुख पदाधिकारी नागपुरात दाखल झाले असून उर्वरित विविध संघटनांचे पदाधिकारी उद्या सकाळपर्यंत पोहोचणार आहेत.

रेशीमबागमध्ये स्मृती मंदिर परिसरात गेल्या चार दिवसांपासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत संघाच्या कोअर कमिटीची बैठकी सुरू असून त्या बैठकीत सभेतील विषयांच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चार तास चर्चा झाली. तीन दिवस होणाऱ्या या सभेत देशातील विविध घडामोडींसोबतच संघटनात्मक बदल होण्याची शक्यता सूत्रांनी या वेळी वर्तवली आहे.

भाजप नेते आज येणार

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राम माधव उद्या शुक्रवारी सायंकाळी नागपुरात येणार आहे. त्रिपुरामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा आटोपून हे नेते येथे येतील.  शनिवारी दिवसभर प्रतिनिधी सभेत उपस्थित राहणार आहे.या शिवाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमनसिंह यांच्यासह पश्चिमांचलमधील त्रिपुरा आणि नागालँडचे मुख्यमंत्री या प्रतिनिधी सभेला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  संघटनमंत्री रामलाल,विश्व हिंदू परिषदेकडून प्रवीण तोगडिया चंपतलाल आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

सुरेश भट सभागृह तीन दिवस बंद

प्रतिनिधीसभेसाठी आलेल्या विविध संघटनाच्या प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था स्मृती मंदिर परिसरात करण्यात आली असली तरी या प्रतिनिधी सभेला असलेल्या स्थानिक आणि जिल्ह्य़ातील प्रतिनिधीची निवास व्यवस्था सुरेश भट सभागृहाच्या पार्किंगमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवस सभागृह बंद ठेवले जाणार आहे.