गणवेश खरेदीतही वाढ

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी उमेदवारी देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका निर्णायक राहणार असल्याने त्यांचा आर्शीवाद मिळावा म्हणून भाजपतील इच्छुक उमेदवारांनी आता संघ शाखांमध्ये जाणे सुरू केले आहे. त्यामळे शाखांमधील संख्या अचानकपणे वाढली आहे. अनेकांनी तर संघाच्या दसरा उत्सवासाठी गणवेश खरेदी केले आहेत.

पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असून चार वाडार्ंचा एक प्रभाग यानुसार नव्याने प्रभाग रचना तयार केली जात आहे. भाजपने यासाठी पूर्वीपासूनच तयारी सुरू केली आहे. संघाशी नियमित संपर्कात असणाऱ्यांचा पक्षाच्या विविध आघाडय़ांमध्ये समावेश करण्यात आला आहे. उमेदवारी देताना स्थानिक पातळीवरील संघ शाखांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी आता संघ शाखांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शाखांमध्ये नियमित जाणाऱ्या स्वयंसेवकांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाल्याने एरवी कधीही  संघात न जाणारे कार्यकर्तेही गेल्या काही दिवसांपासून विविध भागातील सायंकाळ आणि प्रभात शाखेत उपस्थित राहू लागले आहेत. त्यामुळे गणवेश खरेदीत तेजी आली आहे.

उमेदवारीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह कोअर कमिटी घेणार आहे. निर्णय घेताना संघाचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक सक्रिय झाले आहेत.  संघाचा गणवेश विक्रीला आला असताना अनेक विद्यमान नगरसेवकांसह काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघाशी संबंधित असलेल्या संघटनेचे अनेक कार्यकर्ते नुकतेच भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. यापैकी काहींनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी नगरसेवकांचे अहवाल मागितले आहेत. ज्यांची कामगिरी चांगली नाही, त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे यावेळी इच्छुक त्या दृष्टीने कामाला लागले असून त्यांनी संघाचा आधार घेतला आहे.