महाराष्ट्रात मुंबई, पुणे भागात ‘एसटी’ची वातानुकूलित बस धावत असली तरी विदर्भात एकही बस नव्हती. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सिझनमध्ये अव्वाच्या सव्वा प्रवासी दर आकारून येथील प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. प्रवाशांच्या न्यायाकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी)ने राज्यभरात लवकरच ५०० वातानुकूलित बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागाने ८७ बसेसची मागणी केली असून लवकरच त्याला मंजुरी मिळून नागपूरसह विदर्भात वातानुकूलित बस धावण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून विदर्भावर नेहमीच अन्याय होत असल्याची येथील नागरिकांची ओरड आहे. एसटीच्या वातानुकूलित बसेसच्या बाबतीतही हाच प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबई, पुणेसह काही मोठय़ा शहरात एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वातानुकूलित बस धावत आहेत, परंतु महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरसह विदर्भाच्या एकाही शहरात एसटीची वातानुकूलित बस धावत नाही. या बस नसल्याने निश्चितच प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे वळत होते. तेव्हा या ट्रॅव्हल्सकडून सिझनमध्ये प्रवाशांची वाढणारी संख्या व नागरिकांकडे नसलेला विकल्प बघता अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केला आहे.
नागरिकांची सर्रास लूट सुरू असतानाही त्याकडे शासनासह प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष आहे. विदर्भासह राज्यातील नागरिकांची लूट थांबवण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने लवकरच महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात तब्बल ५०० नवीन वातानुकूलित बसेस चालवण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. याप्रसंगी या बसेसच्या वाटपाकरिता एसटीच्या सगळ्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तातडीने प्रस्ताव बोलावण्यात आले होते. त्यानुसार नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयाकडून नुकताच विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जिल्ह्य़ांसाठी ८७ नवीन वातानुकूलित बसेसचा प्रस्ताव दिला गेला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नागपूरकर देवेंद्र फडणवीस असल्याने व केंद्रीय परिवहन मंत्रीपदही नागपूरकर असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे असल्याने या वातानुकूलित बसेसच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रस्ताव सादर करण्यात आलेल्या ८७ बसेस या स्लिपर व बैठक अशा दोन्ही स्वरूपातील आहे. या बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणार असून त्यामुळे निश्चितच प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स ऐवजी प्रवासाकरिता एक नवीन एसटीच्या बसेसचा विकल्प राहणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची विदर्भातील मक्तेदारी संपुष्टात येऊन प्रवाशांची लूट थांबण्यास मदत होईल. विभागाला मिळणाऱ्या सर्वाधिक बसेस या नागपूर शहराच्या वाटय़ाला येतील.

‘मार्गप्राधान्य’
नागपूर विभागाला वातानुकूलित बसेस मिळाल्या तर नागपूर- पुणे, नागपूर- औरंगाबाद, नागपूर- पंढरपूर, नागपूर- नाशिक, नागपूर- शेगाव, नागपूर- हैदराबाद, नागपूर- शिर्डीसह इतर काही मोठय़ा शहरात त्या चालवण्याकरिता प्राधान्य दिले जाणार आहे. निश्चितच त्यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.