महेश बोकडे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) अपघातावर नियंत्रणासाठी अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या विना अपघात सेवा बक्षीस योजनेला ब्रेक लावला आहे. ही योजनाच गुंडाळल्याने वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालवण्यासाठीचे प्रोत्साहन मिळणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. ते जोपासण्यासाठी दरवर्षी विविध योजनांवर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. अनेक वर्षांपूर्वी एसटीने वाहन चालकांसाठी विना अपघात सेवा बक्षीस योजना सुरू केली. या योजनेत एक वर्षांत २६० दिवस विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना एक हजार रुपये आणि एक वर्षांपेक्षा जास्त दिवसांत विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना सहाशे रुपये बक्षीस दिले जायचे. या योजनेतून प्रोत्साहन मिळत असल्याने चालक आणखी काळजीपूर्वक वाहन चालवतात. त्यामुळे अनेक जिल्ह्य़ांत अपघाताची संख्याही कमी झाली आहे. आता  टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी झाली आहे. महामंडळाचे आर्थिक नियोजन बिघडल्याने प्रशासनाकडून खर्च कमी केला जात आहे. त्यानुसार संचालक मंडळाच्या  बैठकीत ही योजना बंद करण्याचा निर्णय झाला. त्याबाबतचे आदेश गुरुवारी एसटीच्या राज्यातील सर्वच विभाग नियंत्रक कार्यालयात पोहोचले.

साडेतीन लाखांचा खर्च

नागपूर विभागात एसटी महामंडळाकडे एकूण ५५० चालक आहेत. यापैकी सुमारे ४०० चालकांना (सुमारे ६० टक्के) या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी हे बक्षीस मिळत होते. त्यामुळे नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाचा या योजनेवर वर्षांला सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च होत होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ांचा अंदाज लावला तर या योजनेवरील खर्च मोठा आहे.

‘‘महामंडळाने विना अपघात सेवा बक्षीस योजना बंद केली असली तरी प्रशासन सर्व वाहनचालकांना अपघात होऊ नये म्हणून विविध प्रकारे प्रोत्साहन देत असते. सोबत चालकांना  प्रशिक्षणही दिले जाते. चालक आपली सर्वोत्तम सेवा देत असल्याने अपघात कमी होण्यास मदत होत आहे.’’

नितीन बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर