दोन डॉक्टरांचा कारनामा; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड

सुपर स्पेशालिटीतील ८३ रुग्णांना खासगी रुग्णालयात पळवून तेथे त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. यानिमित्ताने पुन्हा शासकीय डॉक्टरांच्या खासगी रुग्णालयातील सेवेचा मुद्दा चर्चेला आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा देणाऱ्या कोणत्याही डॉक्टर्सला विनापरवानगी खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देता येत नाही, परंतु अनेक डॉक्टर सर्रास सेवा देतात. त्यातच सुपरमध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ८३ रुग्णांना येथील दोन डॉक्टरांनी पळवून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्याचे पुढे आले आहे.

त्यासाठी दोन डॉक्टरांनी वापरलेल्या क्लृप्तीमुळे विमा कंपनीचे संबंधित खासगी रुग्णालयाला २२ लाख रुपये अतिरिक्त गेले आहे. सोबत या रुग्णांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या सुपर स्पेशालिटीतच झाल्यामुळे या रुग्णालयालाही लक्षावधी रुपयांचा फटका बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मेडिकल आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला या संदर्भात तक्रार दिली.

त्यात सुपरमधून पळवलेल्या ८३ रुग्णाची नाव देत व त्यांच्यावर विशिष्ट खासगी रुग्णालयात कोणत्या तारखेला शस्त्रक्रिया झाली, याचाही तपशील दिला आहे. मध्यंतरी वैद्यकीय संचालक डॉ. संजय देशमुख यांनी खासगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या शासकीय डॉक्टरांना फटकारले होते. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे नवीन कारनामे पुढे आल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

डॉक्टरांची क्लृप्ती

शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शहरातील मेडिकल, मेयो, सुपर या शासकीय रुग्णालयांसह इतरही खासगी रुग्णालयांना मंजुरी दिली आहे. या रुग्णालयांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ‘अ’ दर्जा असलेल्या रुग्णालयांना उपचारापोटी विमा कंपनीकडून अधिक मोबदला मिळतो. सुपरला अ दर्जा आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी सुपरच्या दोन डॉक्टरांनी सुपरमध्ये आलेल्या रुग्णाची येथे विविध तपासणी करून महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मंजुरी घेतली व रुग्ण खासगी रुग्णालयात वळवून तेथे शस्त्रक्रिया केली. ‘अ’ दर्जाच्या रुग्णालयात महात्मा फुले योजनेची मंजुरी असल्याने त्यानुसार खासगी रुग्णालयाले मोबदला घेत होते. त्यामुळे विमा कंपन्यांचेही २२ लाख रुपये अतिरिक्त गेले आहे. सुपरमध्ये या रुग्णांच्या तपासणीपोटी शासनाला लक्षावधींचा फटका बसला आहे.

दोन्ही डॉक्टरांची विभागीय चौकशी लवकरच

सुपर स्पेशालिटीतून खाजगी रुग्णालयात रुग्ण पळवणाऱ्या दोन्ही डॉक्टरांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असल्याची माहिती आहे. या वृत्ताला वैद्यकीय संचालक कार्यालयानेही दुजोरा दिला आहे. या डॉक्टरांची मध्यंतरी सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनीही चौकशी केली होती, परंतु त्यानंतरही या डॉक्टरांच्या वागणूकीत सुधारणा नसल्याने त्यांच्या विभागीय चौकशीचे लवकरच आदेश निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुपरच्या दोन डॉक्टरांबाबत रावसाहेब दानवे यांच्याकडून तक्रार आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्यात येईल.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.