ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला संत्रानगरीत रविवारी धर्मसंसदेचा कार्यक्रम, दुसरीकडे परिवर्तनाची भूमी असलेल्या दीक्षाभूमीवर ओबीसींसह इतरही जातीधर्माच्या हजारो लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्मात प्रवेश केला. दीक्षेनंतर उपस्थित नागपूरकरांनी हस्तांदोलन करून शुभेच्छा प्रदान केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक धम्मदीक्षा परिषदेच्या वतीने दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मराठा, तेली, चर्मकार, मातंग, लिंगायत, धनगरांसह मोठय़ा संख्येने कोकण आणि मराठवाडय़ातील कुणबी बांधव एकत्र आले होते. त्यांना बौद्ध धम्मगुरू भदंत सुरेई ससाई यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. वंदना करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या २२ प्रतीज्ञांचे सार्वत्रिक वाचन केले.

सकाळी संविधान चौकातून दीक्षाभूमीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. दुपारी तीन वाजता सुरेई ससाई यांच्या हस्ते दीक्षाविधीचा कार्यक्रम सुरू झाला. परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती, समता सैनिक दल यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुमारे १२०० नागरिकांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून धम्मदीक्षा ग्रहण केली. यावेळी हजारोंच्या संख्येने बुद्धिस्ट बांधव दीक्षाभूमीच्या पटांगणात नव्याने दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गोळा झाले होते. शहरात एकीकडे मनुस्मृतीचे दहन होत असताना दीक्षाभूमीवर दिखावू उत्साहापेक्षा गांभीर्याने धर्माचे तत्त्वज्ञान आबाला वृद्ध, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही आत्मसात करीत होते. दिवं. हनुमंत काका उपरे यांचे आख्खे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. पत्नी, दोन्ही मुलगे, सुना आणि नातवंडांनीही धम्मदीक्षा घेतली. दीक्षा घेणाऱ्यांमध्ये ८८ वर्षांचे माजी आमदार एकनाथ साळवे उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये विधान परिषदेतील आमदार जोगेंद्र कवाडे आणि इतरही सन्माननीय मंडळी उपस्थित होती. दीक्षाभूमीला दुपारी ३ वाजता दीक्षा समारंभ पार पडला. त्यानंतर ‘युगयात्रा’ हे महानाटय़ सादर करण्यात आले.

संदीप उपरेंना अश्रू अनावर

दिवं. हनुमंत काका उपरे यांनी ओबीसी बांधव बौद्ध धम्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या मृत्यूमुळे गेली तीन वर्षे धम्मदीक्षेचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. धम्मदीक्षेचा आज तो ऐतिहासिक क्षण संपन्न झाल्यानंतर त्यांचा मुलगा संदीप हनुमंत उपरे यांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर आले. काका आज असायला हवे होते आणि हा सोहळा त्यांनी समक्ष पहायला हवा होता, असे भावोद्गार त्यांनी व्यक्त केले.

.. म्हणून बौद्ध धम्म स्वीकारणे गरजेचे

जवळपास ५ हजार ओबीसींनी धर्मातर केले. यात कोकणातील कुणबी मोठय़ा संख्येने आहेत. त्यांच्यात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान फार वर्षांपासून मी रुजवत आहे. ओबीसी कर्मकांड, अंधश्रद्धा, चुकीचे सण उत्सव, परंपरा पाळत बसतात आणि वर्षभर पैसा गमावतात. मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीतून बाहेर आणण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारणे फारच गरजेचे होते.

 जैमिनी कडू, नागपूर</strong>

सुखी होण्यासाठी धर्म स्वीकारला

हे परिवर्तन एका रात्रीतून घडले नाही. तसेच कोणी आम्हाला जबरदस्तीने करायलाही सांगितले नाही. हिंदू देवीदेवतांचा सोडून देऊन कर्मकांडातून लक्ष तर यापूर्वीच काढले आहे, पण यानंतर विपश्यनाच्या मार्गाला लागून शरीरातील विकार घालवणार आहे. हिंगोलीतून ३० पुरुष आणि दोन महिला आल्या आहेत. ओबीसींचे होणारे हाल केवळ धर्मामुळे होत असून धर्माचे जोखड टाकून बौद्ध धम्मात सुखी होण्यासाठी हा धर्म स्वीकारला आहे. भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाने सांगितलेल्या मार्गावरून चालणार आहे.

-संभाजी राऊत आणि वामनराव हराळ, हिंगोली</strong>

अनिसच्या कार्यातून बौद्ध धर्माची वाट

यापूर्वी नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केले. तेव्हाच देवधर्म, उपासतापास थोतांड असल्याचे कळले. त्यानंतर हनुमंतराव उपरे यांच्या मिशनमध्ये काम करीत होते. त्यांनी बौद्ध धर्माची वाट दाखवली. तेव्हापासूनच घरातील देवधर्म हटवले आणि बुद्धाच्या विज्ञानवादी मार्गाला लागले. आता पूर्णत: बौद्ध धर्माचे पालन करते.

– शीला सुभाष मुळे, नाशिक

सारे काही स्वयंप्रेरणेने

बंजारा समाजातही आज परिवर्तन घडत आहे. त्यांनाही त्यांच्या हक्कांची जाणीव होत आहे. बंजारा समाजातील १०-१२ लोक यवतमाळ आणि नांदेडहून या ठिकाणी आले आहेत. त्यांना कुणीही धर्मातर करायला लावले नसून जो तो स्वयंप्रेरणेने आला आहे. आज वेगवेगळ्या जातीधर्माच्या शेकडो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

रमेश राठोड, शिक्षक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of hindus convert to buddhism
First published on: 26-12-2016 at 01:01 IST