महेश बोकडे

राज्यातील सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये तातडीने करोना चाचणी सुरू करण्यासाठी हाफकिनकडून १८ एप्रिल रोजी यंत्र खरेदीचे आदेश निघाले. त्यानुसार विलंबानेच का होईना बारामतीत चाचणी सुरू झाली.  परंतु तीन महाविद्यालयांमध्ये अद्याप यंत्रच पोहचले नसल्याने सर्व जिल्ह्य़ांत करोना चाचणी सुरू होणार कशी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सर्वत्र करोना चाचण्या वाढवण्यासाठी हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळाने (मर्या.) जळगाव, अंबेजोगाई, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया, बारामती या सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसाठी १८ एप्रिल २०२० रोजी यंत्र खरेदीचे आदेश काढले.

पंधरा दिवसांत यंत्र उपलब्ध करण्याची अट त्यात होती. यातील गोंदिया, जळगाव, यवतमाळ, बारामतीत यंत्रांचा पुरवठा झाला. बारामतीत आज मंगळवारी चाचणी सुरूही झाली.  यवतमाळ, गोंदिया, जळगावलाही लवकरच चाचणी सुरू होणार असल्याचा हाफकिनचा दावा आहे. परंतु चंद्रपूर, नांदेड, अंबेजोगाई येथील महाविद्यालयांमध्ये अद्यापही यंत्र पोहोचले नाही.  हाफकिनकडून मात्र, आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत असल्याने अमेरिका व सिंगापूरहून हे यंत्र भारतात यायला विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबत विदेशातून यंत्र आणण्यासाठी नियमानुसार आठ आठवडय़ांची मुदतही दिली जात असल्याचा हाफकिनचा दावा आहे.

‘‘हाफकिनने पहिल्या टप्प्यात ७१ तर दुसऱ्या टप्प्यात ८६ यंत्रांची खरेदी करून मुंबई, नागपूरसह इतरत्र मोठय़ा संख्येने विक्रमी वेळेत करोना प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या. दुसऱ्या टप्प्यात बारामतीत चाचणी सुरू झाली. तीन ठिकाणी लवकरच प्रयोगशाळा सुरू होईल. तीन प्रयोगशाळांचे यंत्र २२ मे पर्यंत पोहोचतील.’’

– डॉ. राजेश देशमुख, संचालक, हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळ