हिंगणा, एमआयडीसी व प्रतापनगरमध्ये खून
नागपूर : सोमवारी दिवसभरात उपराजधानीच्या विविध भागात तीन हत्या घडल्या. या घटनांनी पुन्हा एकदा उपराजधानी हादरली असून तीनपैकी एका खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन खुनांच्या घटनांचा तपास सुरू आहे.
हिंगणा, एमआयडीसी आणि प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत खुनाच्या घटना घडल्या आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत गोपालनगर परिसरात रात्री उशिरा एक खून झाला.
हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. विनीत सुरेश बंसोड (२३), अजनी असे मृताचे नाव आहे. विनीत हा मिहानमधील कंटेनर डेपोत मजुरी करायचा. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे अनेकदा तो घराबाहेर राहायचा.
शनिवारी सकाळी तो घरून कामाकरिता निघाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांना वाटले की तो आपल्या मित्रांसोबत असेल.त्यामुळे त्यांनी कुठेच तक्रार केली नाही. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वेळा हरिश्चंद्रच्या शिवारात एका मोकळ्या व निर्मनुष्य जागेवर त्याचा मृतदेह सापडला. हिंगणा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा दाखल केला.
घटनास्थळाचा पंचनामा केला असता एका दगडाने त्याचा खून करण्यात आला असावा, असे स्पष्ट होते. पोलिसांनी एकाला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले असून अद्याप पोलीस कोणत्याच निष्कर्षांपर्यंत पोहोचली नाहीत.