मेट्रोसाठी वृक्षतोड, सव्वाकोटींचा खर्च

नागपूर मेट्रो रेल्वेसाठी मार्ग तयार करताना तोडलेल्या एकूण झाडांच्या पाचपट झाडे लावावी लागणार आहे. यासाठी अंबाझरी तलावाच्या बुडित क्षेत्राची जागा निश्चित करण्यात आली असून यावर सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जुलै महिन्यापासून हे काम सुरू होणार आहे.

नागपूर मेट्रो रेल्वेच्या मार्गाचे काम सध्या शहराच्या चारही दिशेने सुरू आहे. यासाठी मार्गात येणाऱ्या काही वृक्षांची तोड करावी लागणार असून जितकी झाडे तोडली त्याच्या पाचपट झाडे लावण्याचे व ती जगविण्याचे लक्ष्य नागपूर मेट्रो रेल्वे व्यवस्थापनापुढे आहे. वृक्षतोडीसाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात येत आहे. यासाठी त्यांच्याकडे मेट्रो व्यवस्थापनाने २२ लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा केले आहेत. वृक्ष विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढल्यावर ही रक्कम परत मिळणार आहे.

वृक्ष लागवडीसाठी अंबाझरी तलावाजवळील १५ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. तेथे ५ हजार खड्डे करून झाडे लावण्यात येणार आहे तसेच काही झाडे ही हिंगणा मार्गावर लावण्याचे नियोजन आहे. या झांडासाठी करण्यात येणाऱ्या खड्डय़ात अंबाझरी तलाव शुद्धीकरण मोहिमेत तलावातून उपसण्यात आलेला गाळ (माती) वापरण्यात येणार आहे. या मोहिमेत ७० ट्रक गाळ उपसण्यात आला होता हे येथे उल्ल्ेखनीय. आतापर्यंत ३१२ झाडे तोडण्यात आली असून हिंगणा मार्गावरील १४० झाडे तोडण्यात येणार आहे. तोडण्यात आलेल्या एकूण झाडांपैकी २१५ झाडे ही सुबाभूळाची होती.

मेट्रो रेल्वेने बांधकामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडे हे काम सोपविले आहे. त्यांनी वृक्षलागवडीसाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार एका झाडासाठी वृक्षारोपणापासून तर त्याच्या देखभालीपर्यंत दोन हजार रुपये खर्च येणार आहे. मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाच्यादृष्टीने ही रक्कम जास्त आहे. त्यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकाच्या दुप्पट ही रक्कम होत असल्याने अद्याप या वर एकमत झाले नाही.

झाडे जगवायची असेल तर त्यासाठी खोल खड्डा करावा लागतो, त्याला जास्त खर्च येतो. खोल खड्डा न करता वृक्षारोपण करण्यात आल्यास झाडे जगण्याची शक्यता कमी असते. झाडे जगली नाही तर महापालिकेकडे ठेवण्यात आलेली सुरक्षा ठेव अडचणीत येईल, त्यामुळे मेट्रो प्रशासनही झाडांच्या बाबत गांभीर्याने विचार करीत आहे. जी झाडे लावण्यात येणार आहे, त्यात पारंपरिक वृक्षांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने वड, पिंपळ, कडू लिंब, आंबा, बोर आणि काही फुलझाडांचाही समावेश आहे. अंबाझरी तलावाच्या काठावरून मेट्रोचा मार्ग  असल्याने तेथील स्थानक पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्याचा मेट्रो प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीनेही या वृक्ष लागवडीकडे पाहिले जात आहे.