आज मतदान, गुरुवारी मतमोजणी;  जोशी, वंजारींसह १९ उमेदवार रिंगणात

नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील २ लाख सहा हजारावर पदवीधर त्यांचा विधान परिषदेतील प्रतिनिधी ठरवण्यासाठी मंगळवारी  सकाळी ८ ते सायंकाळी ५ या दरम्यान मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी एकूण ३२२ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. १९ उमेदवार रिंगणात असून भाजपचे संदीप जोशी व काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत आहे. गुरुवारी ३ डिसेंबर रोजी मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.

नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्हे मिळून हा मतदारसंघ आहे. एकूण ३२२ केंद्रांवर १२८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नागपूरमध्ये १६४ मतदार केंद्र असून प्रत्येक केंद्रावर सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

सोमवारी सकाळी सेंट उर्सुला शाळेतून कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. मतदान करण्यासाठी आयोगाने दिलेल्या पेनचाच वापर मतदारांना करता येईल. केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. विभागातील एकूण २ लाख ६ हजार मतदारांपैकी १ लाख १० हजार मतदार नागपूर जिल्ह्यातील आहेत . मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधण्यासाठी महापालिकेने मतदान केंद्रावर संगणक व टॅबसह  कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रावर लक्ष  ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष (वेबकास्ट सिस्टीम) कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी पदवीधर मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले.

मुखपट्टी, हातमोजे केंद्रावर मिळणार

करोना काळातील ही पहिली निवडणूक असल्याने मतदारांसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. मतदारांकडे मुखपट्टी नसेल तर ती केंद्रावर उपलब्ध करून दिली जाईल तसेच त्यांना हातमोजेसुद्धा दिले जातील. सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे लागतील. प्रत्येक मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाईल व त्यानंतरच त्याला मतदानासाठी आत सोडले जाईल. करोनाबाधित मतदार असेल तर त्याला मतदानाच्या शेवटच्या तासात मतदान करू दिले जाईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

२०१४ ची निवडणूक

  •   एकूण मतदार- २ लाख ८७ हजार ११८
  •   झालेले मतदान- १ लाख ७३
  •   टक्केवारी -३७ टक्के
  • प्रा. अनिल सोले (भाजप)-५२,४८५
  • प्रा. बबन तायवाडे (काँग्रेस)-२१,२२६
  • किशोर गजभिये (बसपा)- १९,४५५
  • प्रा. सोले ३१,२५९ मतांनी विजयी