भरतनगरातून पर्यायी रस्ता तयार करण्यास विरोध

भरतनगरातील देवराईला वाचवण्यासाठी नागपूरकरांनी एकत्र येत फुटाळा तलावावर मानवी साखळी तयार केली. भरतनगरमधील ही वृक्षराजी  म्हणजे शहरातील पर्यावरणाचा श्वास आहे. एवढेच नाही तर पशुपक्ष्यांचा तो अधिवास आहे. परंतु फुटाळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी येथून पर्यायी रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान १९८ वृक्ष तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही वृक्षतोड थांबविण्याकरिता बुधवारी सकाळी फुटाळा तलावावर आयोजित मानवी साखळीत नागपूरकर आबालवृद्ध असे सारेच सहभागी झाले होते.

सकाळी ७.३० पासून ही मानवी साखळी तयार होण्यास सुरुवात झाली. त्याआधीपासूनच याठिकाणी विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवी एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. यात प्रामुख्याने सरस्वती विद्यालय, सीडीएस, मॉडर्न स्कूल, सेंटर पॉईंट तसेच इतर शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. काहींनी ‘सेव्ह भारतवन’ लिहिलेले कपडे परिधान केले होते तर काहींनी हा संदेश देणारे फलक हाती धरले होते. रायसोनी, पशुवैद्यक महाविद्यालय, वैद्यकीय शाखेचे शिक्षकसुद्धा यात सहभागी होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील यात सहभाग घेतला. विकास कामांसाठी शहरात यापूर्वीच मोठय़ा संख्येने वृक्षतोड झालेली आहे. त्यामुळे पुन्हा आता शहरातील प्राणवायू हिरावून घेऊ नका, असा संदेश या मानवी साखळीतून देण्यात येत होता. फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भरतनगर येथून ५०० मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. फुटाळा तलावाजवळ संगीत फवारा शो, प्रेक्षक गॅलरी, क्रीडा संकुल आदी बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गात ५०-१०० वर्षे जुने अनेक वृक्ष येत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे पुनरेपण करण्याचे आश्वासन दिले तरी हा हरीत पट्टा लगेच तयार होणे शक्य नाही. भरतनगरातील या देवराईत सुमारे ३२ प्रजातींचे वृक्ष, १२२ प्रजातींचे पक्षी आहेत. ही वृक्षराजी आणि पशुपक्ष्यांचा अधिवास वाचवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून स्वयंसेवी तसेच नागरिक एकत्र आले आहेत. या मोहिमेत माजी मानद वन्यजीव रक्षक गोपाळ ठोसर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यासारख्या ज्येष्ठांनी देखील सहभाग नोंदवला.

उत्साह दांडगा, पण उपक्रमाची माहितीच नाही

या मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांपासून तर महिला, स्वयंसेवी, विद्यार्थी असे सर्वच वयोगटातील, सर्वच स्तरातील लोक सहभागी झाले होते. मात्र, यातील काहींना नेमके फुटाळा वाचवायचे की भरतनगरातील वृक्षसंपदा वाचवायची याची माहिती नव्हती. त्यांना विचारल्यानंतर आम्ही येथे फुटाळा तलाव वाचवण्यासाठी जमल्याचे त्यांनी सांगितले. मानवी साखळीतील इतर काही लोक त्यांना माहिती देत होते.

ड्रोन कॅमेरा जप्त केला

फुटाळा तलावावर आयोजित या मोहिमेचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱ्याने करण्यात येत होते. मात्र, त्यासाठी आवश्यक परवानगीच मोहिमेच्या संयोजकांनी घेतलेली नव्हती. मुख्य कार्यक्रमाचे चित्रीकरण झालेच नाही, पण नंतर जेव्हा चित्रीकरण सुरू झाले तेव्हा त्यासाठीची परवानगीच नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ड्रोन कॅमेरा जप्त केला. त्यानंतर मोहिमेच्या संयोजकांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

फुटाळा तलावाखालून भोसलेकालीन मोठी पाईपलाईन महाराजबागला जोडली गेली आहे आणि महाराजबागेला त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. ही झाडे कापली गेली तर पाईपलाईनला नुकसान पोहचेल. भरतनगरातील वनराईला कुंपण घालून संरक्षित करण्याची गरज आहे. त्यामुळे याठिकाणी वाढणारे अतिक्रमण देखील कमी होईल. देशात नागपूर शहर हे असे आहे की ज्या शहराच्या आत जंगल आहे. त्याचे संवर्धन व्हायला हवे.    – अशोक देशमुख