चंद्रशेखर बोबडे

सत्तेत १५ वर्षे सोबत असताना परस्परांच्या पायात पाय अडकवण्याचा कायम प्रयत्न करणारे विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यात मात्र एकत्र दिसले. विशेष म्हणजे, पवारांच्या भेटीसाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची जणू चढाओढच सुरू होती.

सत्तेत असताना काँग्रेसचे स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसला कायम कमी लेखत आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतर पक्षाच्या मदतीने काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा सत्तेच्या इतरही पदवाटपांचा विषय असो. या दोन्ही पक्षात कायम कलगीतुरा रंगल्याचे चित्र यापूर्वी दिसायचे. निवडणूक प्रचाराचा अपवाद सोडला तर पवार यांच्या यापूर्वीच्या नागपूर दौऱ्यातही स्थानिक काँग्रेस जणांचा सहभाग नावालाच राहायचा. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हे दोन्ही पक्ष संघटनात्मक पातळीवर खिळखिळे झाले होते. या पाश्र्वभूमीवर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी राज्यभर केलेला झंझावती दौरा, त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत पवार बजावत असलेली निर्णायक भूमिका यामुळे पवार दोन्ही काँग्रेससाठी ‘हिरो’ ठरले.

त्याचे प्रतिबिंब त्यांच्या दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यात दिसून आले. विमानतळावरील स्वागतापासून तर ग्रामीण भागातील दौऱ्यात सहभागी होण्यापर्यंत सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच काँग्रेस नेत्यांनीही गर्दी केली होती. पहिल्या दिवशी त्यांच्या ग्रामीण भागातील दौऱ्यात उमरेडचे काँग्रेस  आमदार राजू पारवे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काटोलचे माजी आमदार डॉ.आशीष देशमुख सोबत होते. दुसऱ्या दिवशी पवार यांना सकाळी भेटणाऱ्यांमध्ये मोठय़ा संख्येने स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सहभाग होता. दुपारी झालेल्या आदिवासी मेळाव्यातही पवार यांच्या सोबत व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत, काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी असे दिग्गज काँग्रेसजण होते.

नागपूर आणि जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांसह विदर्भातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पवार यांची भेट घेतल्याने या भागातील काँग्रेस जणू पवार यांच्याच मागे उभी असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले होते.

नितीन राऊत यांच्या निवासस्थानी भेट

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी पवार यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली.

मिहानला भेट

विदर्भातील युवकांना रोजगार मिळावे म्हणून स्थापन झालेल्या मिहान प्रकल्पात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झालेले नाहीत. मात्र, मिहानच्या नावाने सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय हेतू साध्य केले.ही बाब पवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मिहान प्रकल्पाला भेट दिली. मिहानचा आराखडा आणि येथे सध्या सुरू असलेले कारखाने, त्यातून मिळालेला रोजगार यांची माहिती त्यांनी घेतली.

पवारांचा थेट चीनला फोन

नागपुरी संत्रीची चीनसह अनेक देशात निर्यात होत नसल्याचे बागतयदारांनी सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट चीनला फोन लावला.  नागपूर जिल्ह्य़ातील पीकहानीची गुरुवारी पाहणी केल्यानंतर आज त्यांनी रविभवनात शेतकऱ्यांशी संवाद साधला. संत्रा उत्पादकांच्या तक्रारीवरून थेट चीनमधील भारतीय  वाणिज्य समन्वयक प्रशांत लोखंडे यांना फोन लावला व त्यांना संत्री निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण  करण्याची सूचना केली. पवार यांच्या या कार्यपद्धतीने बागयदार शेतकरी देखील सुखावले. नागपुरातील संत्री जगप्रसिद्ध आहेत. मात्र, ही संत्री प्रायोरिटी प्रोटोकॉल लिस्टमध्ये नाही, याकडे शेतकऱ्यांनी पवार यांचे लक्ष वेधले. यावर पवारांनी महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. काही वेळानंतर लोखंडे यांनी ठाकरे आणि देशमुख यांना फोन केला. तसेच या मुद्यांच्या अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, माजी मंत्री अनिल देशमुख, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे यांचा समावेश असल्याचे सांगितले. ही समिती सविस्तर अहवाल सादर देणार आहे.

आणि विषय बदलला!

कुही तालुक्यात पिकहानीची पाहणी करीत असताना शरद पवार यांना उसाची प्रत बघण्यासाठी ऊस मागवला. यावेळी शेतकरी येथे गोळा झाले. तेव्हा पवार यांनी उसाचे पैसे वेळेवर मिळतात का, असा प्रश्न शेतकऱ्यांना केला. तसेच १५ दिवसांत उसाचे पैसे मिळायला हवे, असा नियम आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांनी सहा-सहा महिने पैसे मिळत नाहीत, असे गाऱ्हाणे मांडले. याचवेळी एका शेतकऱ्याने येथील ऊस नितीन गडकरी यांच्याशी संबंधित पूर्ती साखर कारखान्यात जातो, असे सांगितले. गडकरी कुटुंबाशी संबंधित कारखान्यातून सहा-सहा महिने शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही, हे पवार यांच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेच इतर पिकांबद्दलची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि उसाचा विषय तेथेच संपवला. अशाप्रकारे पवार यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची हानी बघतानाच गडकरींसोबतचा स्नेह कायम ठेवण्याची किमयाही साधली, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीमध्ये होती.

परतीच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पीकहानी झाली. शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांच्या भेटीसाठी शरद पवार येणार असल्याने एक कर्तव्य म्हणून सर्व काँग्रेसजण त्यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी हा आमचा मित्रपक्ष आहे व पवार हे आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात सर्वानी सहभागी व्हावे,अशा सूचना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून काँग्रेसजणांना दिली होती.

– राजेंद्र मुळक,  माजी मंत्री व अध्यक्ष जिल्हा काँग्रेस समिती.