महाविकास आघाडीचे मेळावे, मोर्चावर कुठलेही निर्बंध नाहीत आणि राज्यात शिवजयंती उत्सवावर मात्र निर्बंध लादले जात आहेत. असे निर्बंध का, राज्यात मोगलाई आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नागपुरातील शिवाजी नगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. करोना वाढत आहे. त्याबाबत काळजी घेतली पाहिजे. मात्र गेल्या वर्षभरात अनेक उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले गेले. आता तर महाविकास आघाडीकडून मोर्चे, मेळावे आयोजित केले जात आहेत. त्यावर कुठलेही निर्बंध नाहीत आणि शिवजयंती उत्सव साजरे केले तर कलम १४४ लावले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्य सरकार विदर्भ व मराठवाडय़ाचा विकास निधी पळवत आहे. विदर्भ वैधाानिक विकास मंडळ बंद करून यांनी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. विधानसभा अध्यक्षनिवडीची तारीख राज्यपालांनी ठरवून गुप्त मतदान पद्धतीने ती निवडणूक करावी, असे संविधानात सांगितले आहे. या सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान मान्य आहे की नाही, अशा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने कृषीचा सेस पेट्रोल-डिझेलवर लावला, पण ३ रुपयांनी कर कमी केला. तसे राज्य सरकार करत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक अहवाल न्यायालयात आहे. त्यावर अजून निर्णय यायचा आहे. आता यावर बोलणे योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारत नाहीत

वीज देयकांबाबत काँग्रेस सत्तेत राहून निर्णय घेऊ शकत नाही. आघाडीतील दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारत नाहीत. ऊर्जा खाते काँग्रेसकडे आहे. मग त्यांनी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत. त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.