News Flash

वाघांचे कृत्रिम स्थलांतरण, हा जबाबदारी झटकण्याचाच प्रकार!

वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव म्हणजे जबाबदारी नाकारण्याचाच प्रकार आहे.

वाघ जास्त झाले आणि त्यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू झाली म्हणून ते इतरत्र स्थलांतरित करायचे यावर गेल्या काही दिवसांपासून वनखात्यात खलबते सुरू आहेत. विशेषत: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बाबतीत संबंधित वनविभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे प्रस्तावही पाठवला आहे. मात्र, वाघांचे स्थलांतरण हा अस्तित्वाच्या लढाईमागील एकमेव उपाय ठरू शकतो का? असा प्रश्न जेव्हा वन्यजीवतज्ज्ञांना विचारला गेला तेव्हा बहुतेकांनी त्यांचे उत्तर नाही हेच दिले. अगदी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनीही वाघांचे स्थलांतरण हा त्यावरील एकमेव उपाय ठरू शकत नाही हेच उत्तर दिले. नोकरी म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून आयुष्याची ४० वष्रे स्वत:ला जंगल आणि वन्यजीवांसाठी झोकून देणारा हा ऋषीतूल्य माणूसही जेव्हा हा पर्याय नाकारतो, याचाच अर्थ वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव म्हणजे जबाबदारी नाकारण्याचाच प्रकार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या प्रशासनाने कदाचित गुजरातच्या गीर अभयारण्याचा आदर्श डोळयापुढे ठेवून हे पाऊल उचलले असावे, पण परिस्थिती, वातावरण याही बाबी अभ्यासणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. वाघांचा मृत्यूचे नेमके कारण समजले नाही की, प्राथमिक कारणात त्याला अस्तित्वाच्या लढाईसाठी झालेल्या संघर्षांमुळे वाघाचा मृत्यू असे कारण देऊन मोकळे व्हायचे. अलीकडच्या काही वर्षांत हा प्रकार अधिकच रूढ झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्यानंतर प्राथमिक अहवाल काय, तर ‘दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू’! नंतर त्याचा तपास होतो किंवा नाही हे मग जनसामान्यांनाही कळत नाही आणि संबंधित विभागही त्याची दखल घेणे कदाचित विसरतो. फार फार तर एक-दोन वेळा हे होऊ शकेल, पण प्रत्येकच वेळी त्याच्या मृत्यूसाठी हेच कारण होऊ शकते का? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत वनखात्याच्या याच पद्धतीवर कोरडे ओढले. चार राज्याचा आढावा घेताना वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण न देण्याच्या बाबतीत महाराष्ट्राचे वनखाते आघाडीवर असल्याचे सांगितले. दोन-चार नव्हे तर तब्बल ३५हून अधिक वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत वनखात्याने अंतिम अहवालच प्राधिकरणाचा सुपूर्द केला नव्हता. एवढेच नव्हे तर ‘दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू’, ‘अस्तित्वाच्या लढाईत मृत्यू’ अशी कारणे वनखात्याने दिली होती. त्यामुळे प्राधिकरणाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी याचा चांगलाच समाचार घेतला. ‘प्रत्येकवेळी हेच कारण कसे असू शकते?’ यावरून त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

पर्यटनावर भिस्त, संवर्धनाकडे दुर्लक्ष
मुळातच पर्यटनावर अधिक भर देणाऱ्या वनखात्याच्या वृत्तीमुळे वन्यजीवांसोबतच जंगलाच्या संवर्धनाकडे त्यांचे लक्ष्य कमी झाले आहे. ज्या वन्यजीवांच्या दर्शनाच्या भरवशावर पर्यटकांकडून खोऱ्याने वनखात्याला पैसा मिळतो, तेच वनखाते जंगलाचा पोत सुधारण्याकडे कानाडोळा करते. वाघांच्या भक्ष्यांसाठीच खाद्य नसेल तर वाघांना खाद्य कसे मिळणार? आणि वाघांचे खाद्य नसेल तर संघर्ष किंवा जंगलातून बाहेर पडण्याचे प्रकार घडणारच! स्थलांतरणाचा प्रस्ताव एकवेळ मान्य केला तरी ही एवढी सोपी प्रक्रिया नाही. एकतर ज्या ठिकाणी वाघ स्थलांतरित करायचे, तो परिसर त्याच्यासाठी पोषक आहे किंवा नाही याची चाचपणी म्हणजेच अभ्यास करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचवेळी एवढय़ा वाघांना स्थलांतरित करायचे म्हटल्यानंतर त्यांना ‘ट्रँक्विलायजर गन’ने बेशुद्ध करून नंतर पिंजऱ्यात टाकणे आणि मग ते इतर जंगलात नेऊन सोडणे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही. मुळातच वनखात्यात ‘ट्रँक्विलायजर गन’ने वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण असणारे तरबेज अधिकारी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. अशावेळी एवढय़ाा वाघांना ‘ट्रँक्विलाईज’ करताना थोडेही कमीजास्त प्रमाण झाले तर ते वाघांच्या जीवावर बेतू शकते. वाघांचे कृत्रिम स्थलांतरण करण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक स्थलांतरणाचा मार्ग सुरक्षित करण्याकडे म्हणजेच त्यांचे कॉरिडॉर, जंगलाची संलग्नता सुरक्षित केली तर नैसर्गिक स्थलांतरणाची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

वाघांची वाढती संख्या हे कारण नव्हे!
अभयारण्य किंवा व्याघ्रप्रकल्प कोणताही असो, वाघाला खाद्यांन्नाची कमतरता नसेल आणि त्यांच्या खाद्यान्नासाठी परिस्थिती योग्य असेल तर वाघ अभयारण्य किंवा व्याघ्रप्रकल्पापासून दूर जाऊच शकत नाही, हे चितमपल्ली यांचे म्हणणे अगदी योग्य वाटते. लँटेनासारख्या वनस्पतीच्या अभयारण्यात वेगाने होणाऱ्या वाढीमुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे सांगितले. आताही उमरेड-करांडला अभयारण्यातून गायब झालेल्या ‘जय’च्या बाबतीत वाघ अधिक झाल्यामुळे त्याला बाहेर ढकलण्यात आले, हे कारण संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आणि या कारणांवर तज्ज्ञांमध्येही बरेच हसू उमटले. मुळातच उमरेड-करांडला अभयारण्यात तृणभक्षी प्राण्यांना लागणाऱ्या गवताची कमतरता होती आणि परिणामी याठिकाणी तृणभक्षी प्राणीही कमी होते. त्यामुळे अभयारण्य होण्याआधीपासूनच गावकऱ्यांची जनावरे हेच येथील वाघांचे भक्ष्य होते. वाघ अधिक झाल्यामुळे ते बाहेर पडतात किंवा त्यांच्यात लढाई होते, हे तात्पुरते मान्य केले तर मग नागझिरा अभयारण्यातून गेल्या काही वर्षांत वाघांचे स्थलांतरण का सुरू आहे? नागझिऱ्याचे क्षेत्रफळ तर मोठे आहे? या ठिकाणीही तृणभक्षी प्राण्यांना लागणारे गवत नसल्याने आणि पोषक अधिवासाची कमतरता निर्माण झाल्याने वाघांचे अस्तित्त्व संपायला आले, हे मूळ कारण असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासात समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 2:49 am

Web Title: wildlife experts view on artificial migration of tiger for conservation
Next Stories
1 मेळघाट पुन्हा शिकाऱ्यांच्या रडारवर
2 ‘बीपीएल’ रुग्णांना अँजिओग्राफी मोफत, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मात्र वसुली!
3 जिल्ह्य़ातील ५०० गावे डिजिटल करण्याची मुख्यमंत्री घोषणा करणार
Just Now!
X