पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेती क्षेत्रात गुंतवणूक

शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी देऊन थांबणार नसून त्यांना आर्थिक सुराज्य मिळवून देण्यासाठी येत्या दोन वर्षांत शेतीत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक वाढवून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.

कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस यांचे नागपूर येथे विविध कार्यक्रमासाठी आगमन होताच विमानतळावर भाजपतर्फे त्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. त्यानंतर चिंचभुवन येथील उड्डाण पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हा व शहरातील सर्व आमदार उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले. फक्त कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, शेती क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करू, त्यासाठी लवकरच आराखडा तयार केला जाईल.

यासाठी लागणारा निधी जगभरातील अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून उभा केला जाईल व त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाह बाजारपेठ आणि इतरही सुविधा उपलब्ध करून देऊ. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले होते तसेच प्रयत्न राज्यात शेतकऱ्यांसाठी सुराज्य स्थापन व्हावे म्हणून केले जातील, असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या तिजोरीची दारे उघडी आहेत, गरज पडली तर केंद्राकडून जास्तीत जास्त निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करू व प्रसंगी यासाठी गडकरी यांची मदत घेऊ, असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे पाप कारणीभूत असल्याचा, आरोपही त्यांनी केला.

गडकरी-फडणवीसांची परस्परांवर स्तुतीसुमने

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळली. कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल गडकरी यांनी फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय राज्यभरातील शेतकऱ्यांना न्याय देणारा आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील चिंचभवन उड्डाण पुलाची अनेक वर्षांपासूनची लोगमागणी पूर्ण केल्याबद्दल तसेच राज्यात २२ हजार किलोमीटरचे रस्ते बांधकाम केले जात असल्याबद्दल फडणवीस यांनी गडकरींच्या कामाच्या धडाडीचे कौतुक केले.b