नागपूर : स्वत:च्या दोन मुलांना विहिरीत ढकलून पळून जाणाऱ्या एका महिलेला मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. तिला मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मध्यप्रदेशातील सुल्तानपूरच्या २६ वर्षीय या महिलेने चार दिवसांपूर्वी आपल्या पोटच्या चार वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षीय मुलाला विहिरीत ढकलले आणि पळून गेली. चार दिवसांपासून ती बेपत्ता होती. पतीने तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर त्यांनी सुल्तानपूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पतीने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे ती घरून निघतेवेळी दोन्ही मुले सोबत होती. परंतु घरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत दोघे चिमुकले मृतावस्थेत आढळले.पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. ती संपर्क क्रांती एक्स्प्रेसने नागपूरमार्गे निघाली असल्याची माहिती सुल्तानपूर पोलिसांना मिळाली. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरील नियंत्रण कक्षाला सूचना दिली.

या माहितीच्या आधारे आरपीएफचे एसआयपीएफ एस.पी. सिंग यांच्या नेतृत्वात महेश गिरी, शिवराज पवार, शशिकांत गजभिये यांच्यासोबतच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुबारक शेख यांच्या उपस्थितीत संपूर्ण ताफा फलाट क्रमांक दोन वर पोहचला आणि नागपुरात रेल्वे पोहोचताच तिला अटक केली.