लोकसत्ता टीम

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघ विरुद्ध मानव यांचे “क्लोज एन्काऊंटर” ही नित्याची बाब झाली आहे. ती एक सामान्य परिस्थिती आहे आणि याची वाघाला व माणसाला अशी दोघांनाही सवय झाली आहे. असेच एक “क्लोज एन्काऊंटर” वाघाचे एका माणसासोबत नाही; तर अनेक माणसांसोबत घडले. जुनोना-देवाडा बफर झोन येथील हे दृष्य वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी कॅमेऱ्यात कैद केले.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे चाहते देशभरात आणि देशाच्या बाहेर देखील आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक ताडोबातील वाघांची एक झलक बघण्यासाठी या व्याघ्रप्रकल्पात येत आहेत. या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच नाही तर बफर क्षेत्रात देखील पर्यटकांना सहज व्याघ्रदर्शन होत आहे. त्यामुळे ताडोबाच्या गाभा क्षेत्रासोबतच बफर क्षेत्रात देखील पर्यटकांची संख्या वाढली आहे.

या व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे अनेक किस्से आहेत. इथल्या प्रत्येक वाघाची एक वेगळी कथा आहे. मग जिच्या बेपत्ता होण्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही ती ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील “माया” वाघीण असो किंवा ताडोबाच्या बफर क्षेत्रातील “सीएम” या नावाने ओळखला जाणारा ” छोटा मटका” असो. पर्यटकांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील व्याघ्रदर्शन म्हणजे पर्वणीच. ते पैसे खर्च करून व्याघ्रदर्शनासाठी या व्याघ्रप्रकल्पात येत असतात.

मात्र, या व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावातील लोकांसाठी व्याघ्रदर्शन नित्याची बाब झाली आहे. कधी जंगलालगतच्या रस्त्यावरून घरी परतताना, तर कधी बाहेर जाताना अचानक वाघ समोर येतो. मात्र, याची सवय आता दोघांनाही झाली आहे आणि दोघेही एकमेकांकडे बघत आपापल्या वाटेने परत जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुनोना-देवाडा बफर क्षेत्रात काही बायका शेतात काम करण्यासाठी जात होत्या. त्यांना रस्त्याच्या कडेलगतच्या जंगलात वाघ असल्याची चाहूल लागली आणि तो बाहेर येण्याच्या आतच त्या पळाल्या. मात्र, जेव्हा वाघ बाहेर पडत रस्त्यावर आला, तेव्हाही रस्त्यावर काही नागरिक दुचाकीवर होते. अचानक वाघ समोर आल्याने, तेही दचकले. तर त्याचवेळी काही पर्यटकांच्या जिप्सी देखील त्याठिकाणी आल्या. मात्र, वाघाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकत रस्ता पार करून कडेचे जंगल गाठले.