अमरावती : महावितरणच्या टीओडी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर १ जुलै २०२५ पासून ‘टीओडी’ (टाइम ऑफ डे) सवलत लागू झाली आहे. ‘टीओडी’ मीटर बसवलेल्या अमरावती परिमंडळातील १ लाख ११ हजार ११९ घरगुती ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात १५ लाख ६५ हजार रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना ‘टीओडी’प्रमाणे वीजदरात सवलत; मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरु झाला आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे वाचन स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्यामुळे अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७ – २८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे, असे महावितरणचे म्हणणे आहे.

ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.