’ स्वयंसेवी संस्थांसह विद्यार्थ्यांचा सहभाग ’ पहिल्या दिवशी हजारावर रोपांची लागवड
गतवर्षीच्या चुका टाळत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वनखात्याच्या वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रातून करण्यात आला. याकरिता शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसह विद्यार्थ्यांनीही वनखात्याच्या खांद्याला खांदा लावून वृक्षारोपण केले. निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या संवर्धनासाठी सर्वच यावेळी मनापासून सहभागी झाले आणि एकाच दिवशी सुमारे हजारावर रोपांची लागवड या ठिकाणी करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात येत्या सात दिवसात १६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ते साध्य करण्यासाठी वनखात्याच्या खांद्याला खांदा लावून सर्वच या उपक्रमात सहभागी झाले होते. ७ जुलैपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्ष लागवडीने करण्यात आला. या उपक्रमात राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. अधिकाऱ्यांपासून तर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक असे सर्वच जण एकमेकांना वृक्षारोपणासाठी मदतीचा हात देताना यावेळी प्रथमच दिसून आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेसुद्धा वरिष्ठपदाचा अंगरखा दूर सारत विद्यार्थ्यांना रोपटे लावण्यास मदत केली. वृक्षारोपण पार पडल्यानंतर सर्व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, आमदार समीर मेघे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य राखीव पोलीस दल गट क्र. चार नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) श्री भगवान, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश धोटेकर यांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह
विद्यार्थी फक्त शिक्षक म्हणतात म्हणून येत नाही तर निसर्गाची ओढ त्यांना निसर्ग संवर्धन कार्यात आणते हे आज विद्यार्थ्यांच्या उत्साहावरून स्पष्ट झाले. राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात आयोजित वृक्ष लागवडीत सेंट उर्सूला, भवन्स, रायसोनी, सांदीपनी या शाळांमधील स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी होते. शालेय शिस्तीचा परिचय त्यांनी वृक्षलागवड कार्यक्रमातही दिला. लावण्यात येणाऱ्या प्रत्येक झाडाजवळ दोन-दोनच्या संख्येने विद्यार्थी उभे होते आणि त्याच शिस्तीत योग्यपद्धतीने वृक्षलागवड देखील केली. विशेष म्हणजे सेंट उर्सूलाचे विद्यार्थी त्यांच्या बँड पथकासह या सहभागी होते.
‘त्याच’ प्रकाराची पुनरावृत्ती?
राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रातील वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंभात पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार तसेच अधिकाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलांचे जवान आणि विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले. यात व्हीआयपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचे फलक त्या त्या वृक्ष लागवडीच्या ठिकाणी लावण्यात आले होते आणि लावलेले रोपटे जगवण्यासाठी सुरक्षा कठडेही त्यांच्यापुरतेच उपलब्ध करण्यात आले होते. नावांच्या फलकांचे सोडा, पण सुरक्षा कठडे लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपटय़ासाठी उपलब्ध असायला हवे होते. अन्यथा, गेल्या वर्षी हिंगणा एमआयडीसी परिसरात जो प्रकार घडला आणि केवळ व्हीआयपींचीच रोपटी जगली. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती यावर्षीही झाल्यास नवल नाही.
मोहिमेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह
वनखात्याच्या मोहिमेत यावेळी सर्वच शासकीय, प्रशासकीय संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यात महापालिकाही सहभागी असून, वृक्ष लागवडीसाठी त्यांनी निवडलेल्या जागेमुळे पालिकेच्या वृक्ष लागवड मोहिमेतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरमपेठ क्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुदामनगरीचा परिसर म्हणजे काळया दगडांचा आहे. याठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे आणि त्यासमोरच कचरा आणून टाकला जातो. याच कचऱ्यावर महापालिकेने माती टाकून सुमारे १०० रोपटी लावण्याचा घाट घातला. त्यामुळे मोहिमेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोराडी औष्णिक केंद्रात वृक्षारोपण
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात शनिवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राज्यभरात महानिर्मितीच्या विविध प्रकल्प, वसाहती व जागेत ३६ हजार ५०० झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी कैलाश चिरूटकर, अर्चना दिवाणे, अभय हरणे, विवेक रोकडे, राजेश पाटील, अरूण वाघमारे, गिरीश कुमरवार, राजेश कराडे, किरण धुळे उपस्थित होते. १ ते ७ जुलै या कालावधीत हे केंद्र, सिपोरेक्स वसाहत, सी टाईप परिसर, प्रकल्प, बांधकाम व स्थापत्य व प्रशिक्षण कार्यालय मिळून सुमारे ५,७०० झाडे लावण्यात येणार आहेत. उबर, चिंच, कडूनिंब, सत्पवर्णी, करंजी, आवळा, आंबा, गुलमोहर, अशोक, फणस, बेल, लिंबू, पेरू इत्यादी उपयुक्त झाडे लावण्यात येणार आहेत.
महावितरणतर्फे पाच हजार वृक्षारोपणाचा निर्धार
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक प्रविभागातील विविध कार्यालये, उपकेंद्र परिसरात शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. सात दिवसांत नागपूर जिल्ह्य़ांत पाच हजारांवर वृक्षारोपण करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते गणेशपेठ येथील नागपूर ग्रामीण १, विभागीय कार्यालय परिसरात नारळाचे रोप लावून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही प्रत्येक कार्यालयात वृक्षारोपणाच्या मदतीने प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याकरिता प्रयत्न करण्याची हमी दिली. याप्रसंगी उमेश सहारे, शरद दाहेदार, राकेश जनबंधू, मनीष वाठ, नारायण आमझरे, बंडू वासनिक, प्रफुल्ल लांडे, विजय राऊत, कुंदन भिसे, दीपाली माडेलवार उपस्थित होते.
.. अन् त्यांनी अंत्यसंस्काराच्या आधी वृक्षारोपण केले
नागपूर ; राज्यात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असताना गंगाबाई घाटावर मात्र नबाबपुरामधील एका कुटुंबातील सदस्यांनी पर्यावरण दिनाचे निमित्त साधून आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास बघता आधी वृक्षारोपण केले आणि त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. खऱ्या अर्थाने त्या वृक्षाच्या रूपाने त्यांची स्मृती जागृत ठेवण्याचे नबाबपुरा भागातील सोनी कुटुंबीयांनी केले.
नबाबपुरा भागात राहणाऱ्या सुनंदा सुरेश सोनी यांचे शनिवारी सकाळी अल्प आजाराने वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. पर्यावरण प्रेमी असलेल्या सुनंदा सोनी यांनी आयुष्यभर घराच्या परिसरात विविध आकर्षक झाडे लावत तो छंद म्हणून जोपासला होता आणि पर्यावरणाच्या दिवशी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर आल्यानंतर विसावावर पार्थिव ठेवण्यात आले आणि त्यानंतर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करणार येणार होते त्या ठिकाणी पार्थिव ठेवले. घाटावर काही वेळापूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला असताना कुटुंबीयांच्या सदस्यांनी परिसरात वृक्ष लावण्याची विनंती केली आणि घाट परिसरातील कर्मचाऱ्यांनी त्यांना वृक्ष उपलब्ध करून दिले आणि अंत्यविधी होण्याच्या आधी कुटुंबातील सदस्यांनी घाट परिसरात वृक्षारोपण केले आणि त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. आयुष्यभर घरामध्ये रोपटे लावण्याचा छंद जोपणाऱ्या सुनंदा सोनी यांच्या स्मृतीनिमित्त नातेवाईकांनी वृक्ष लावत खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांचे जावई श्याम डोंगरे म्हणाले, सुनंदा सोनी आकड सासू होत्या. त्यांनी घरी झाडे लावण्यासोबतच ती जगविली. त्यांना ब्रेन हॅमरेजचा झटका आला आणि अनेक दिवसापासून त्या आजारी असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. वृक्षदिन राज्यात साजरा होत असताना शेवटी अंतिम संस्कार करण्याच्या आधी त्यांच्या नावाने वृक्ष लावावे, असे वाटले आणि घाटातील कर्मचाऱ्यांनी ते उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांची झाडाच्या रूपाने का होईना स्मृती जागृत ठेवल्या आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे संघ मुख्यालय आवारातच वृक्षारोपण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सह सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी शनिवारी सकाळी संघाच्या मुख्यालय आवारात ‘झाडे लावा आणि जगवा’ असा देत वृक्षारोपण केले. गेल्या वर्षी संघ मुख्यालयाच्या मागील मैदानात डॉ. भागवत आणि सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते, त्या ठिकाणी एकही झाड शिल्लक राहिले नाही. शनिवारी सकाळी कुठलाही गाजावाजा न करता संघाच्या मुख्यालयात डॉ. भागवत यांनी आंब्याचे झाड लावले. यावेळी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनीही वृक्षारोपण केले.