अमरावती : १ जानेवारी हा वैश्विक नवीन वर्षारंभाचा दिवस मानला जात असला तरी, भारताच्‍या प्रत्‍येक राज्‍य, समुदायाचे स्‍वत:चे नवीन वर्ष असते. असाच एक नवीन वर्षाचा सण म्‍हणजे गुढी पाडवा. या दिवशी प्रत्‍येकाच्‍या दारात गुढी उभारली जाते. याच दिवशी अमरावती जिल्‍ह्यातील एका गावात यात्रा भरते. यात्रेच्‍या दिवशी हजारो भाविक श्रद्धेपोटी कापूर जाळतात.

चांदूर रेल्वे तालुक्यातील १६०० लोकवस्ती असलेल्या सावंगा विठोबा गावाला कापुराचे गाव अशी ओळख मिळाली आहे. कारण, येथे दररोज किमान १० किलो कापूर जाळला जातो. त्याचप्रमाणे गुढी पाडव्याला येथील श्रीकृष्ण अवधूत महाराज संस्थानात मोठी यात्रा भरते. या वेळी किमान १२ क्विंटल कापूर जाळला जातो. ही परंपरा ३५० वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेने येथील बऱ्याच गावकऱ्यांना रोजगार दिला आहे.

गुढी पाडव्याला श्रीकृष्ण अवधूत महाराज संस्थान सावंगा विठोबा येथे भरणारी यात्रा विशेष असते. या कालावधीत मंदिरात समांतर असलेल्या दोन लाकडी ध्वज खांबांना त्यावर पाय न ठेवता खोळ चढवली जाते. तसेच एकाच दिवशी १२ क्विंटल कापूर जाळला जातो. जिल्ह्यासह राज्य व देशभरातून गुढी पाडव्याला किमान ४ लाख भाविक दर्शनाला येत असतात. ३५० वर्षांआधी कृष्णाजी महाराज यांनी कापूर जाळण्याची परंपरा सुरू केली, ती पुनाजी महाराज यांनीही पुढे सुरू ठेवली. त्यामुळे ती अजूनही अव्याहतपणे सुरू असून यात गावातील भाविकांसह देशभरातील भाविकांचे योगदान असते. आठवड्यातील बुधवार व रविवारी येथे मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढेच नव्हे तर दर अमावस्येला चंदन उटी सोहळ्यातही भाविकांकडून कापूर प्रज्वलित केला जात असतो. त्यामुळे सावंगा विठोबा गावाला कापुराचे गाव अशी ओळख मिळाली आहे. येथे दरवर्षी नियमितपणे शेकडो क्विंटल कापूर जाळला जात असल्यामुळे हा कापूरच आता येथील गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. अनेक भाविक स्वत:सोबत कापूर आणत नाही. तर येथेच तो किलोने खरेदी करतात. जेव्हापासून या गावातील मंदिरात कापूर जाळला जातो. तेव्हापासून येथे कापुराची विक्री केली जाते. त्यामुळे गावात प्रवेश करताच कापुराचा सुगंध नाकात शिरतो. या कापुराच्या सुगंधामुळे गावातील वातावरणही शुद्ध राहते. यंदा गुढी पाडव्‍याला यात्रेच्‍या निमित्‍ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.