यवतमाळ : येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना ‘एमआरआय’सारख्या चाचण्यांसाठी बाहेर जावे लागते. ही अडचण दूर व्हावी म्हणून २०१७ मध्ये शिर्डीच्या साई संस्थानने येथील वैद्यकीय महाविद्यालयास एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी दिला. ही मशीन येथे येण्यास सहा वर्षांचा कालावधी लागला. आता तीन महिन्यांपासून इन्स्टॉलेशन सुरू असल्याने रुग्णांना या तपासणीसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या एक एमआरआय मशीन आहे. त्यावर काम सुरू आहे. मात्र ती अपुरी पडत असल्याने साई संस्थानने २०१७ मध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जापानी तंत्रज्ञानाची एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी दिला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी याबाबत हाफकिनकडे प्रस्ताव पाठवला. मात्र त्यानंतर वरच्या पातळीवरून मान्यता मिळविण्यासाठी महाविद्यालय प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करण्यात कमी पडल्याने बरीच वर्षे हा निधी मिळाला नाही. दरम्यानच्या काळात मशीनच्या किमतीत वाढ झाल्याने या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधीची गरज भासली. त्यामुळे साईसंस्थानने दिलेल्या १३ कोटी रुपयांमध्ये डीपीसीमधून निधी देण्याची तरतूद करण्यात आल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागला.

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा तडाखा

जापानहून तीन महिन्यांपूर्वीच येथे एमआरआय मशीन आणली गेली. येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या मशीनच्या मॅकेनिकल इन्स्टॉलेशनचे काम सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडियोलॉजी विभागप्रमुख डॉ. अरुणा पवार यांनी दिली. इलेक्ट्रिक, हेलियम, ट्रॉन्सफार्मर आदी कामे सुरू आहेत. मशीनच्या इन्स्टॉलेशनकरिता आणखी महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर येथे रुग्णांची प्रत्यक्ष तपसाणी सुरू होईल, असे डॉ. पवार म्हणाल्या. त्यामुळे रुग्णांना साई संस्थानच्या निधीतून मिळालेल्या एमआरआय मशीनचा लाभ मिळण्यास प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

हेही वाचा – अवकाळी पावसाने पीक हानी, फडणवीस म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेडियोलॉजी विभागात अधिकारी, तंत्रज्ञांचा अभाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रेडियोलॉजी विभागात डॉक्टर, तंत्रज्ञांचा अभाव असल्याने रुग्णांची तपासणी केल्यानंतर निदानासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी या तांत्रिक तपासण्यांचा कारभार केवळ दोन डॉक्टरांवर सुरू आहे. कंत्राटी तंत्रज्ञ या कामी ठेवण्यात आले आहे. ते रुग्णांची तपासणी करतात, मात्र आलेल्या रिपोर्टचे निदान करण्यासाठी केवळ दोनच डॉक्टर असल्याने रुग्णांची परवड होत आहे. त्यामुळे या विभागात तंत्रज्ञ आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल ठाकरे यांनी केली आहे. अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने साई संस्थानने दिलेल्या एमआरआय मशीनचा कितपत लाभ रुग्णांना होईल, याबाबत शंकाच आहे.