नागपूर : ख्वाहिश नागरे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या धक्यातून शहर सावरतही नाही तोच वनाडोंगरी येथील मंगलमूर्ती कॉलनीत आणखी एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून मृत्यूला कवटाळले.

अलिकडेच आलेल्या नीट परीक्षेच्या निकालात मिळालेल्या अपयशामुळे ही मुलगी मानसिकदृष्ट्या पुरती खचली होती. तिचे वडील शहर वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत. सलग दोन विद्यार्थी आत्महत्येच्या या घटनांमुळे उपराजधानी हादरून गेली आहे.

वैदेही अनिल उईके (वय १७) असे गळफास लावून आत्महत्येचा मार्ग निवडलेल्या मुलीचे नाव आहे. वैदेहीचे वडील अनिल नागपूर शहर वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत. वैदेहीची मोठी बहीण एमबीबीएसचे शिक्षण घेत असून ती परदेशात आहे. त्यामुळे वैदेहीने यावर्षी नीट परीक्षा दिली होती, परंतु तिला कमी गुण मिळाले. तरीही ती पुनर्परीक्षेची तयारी करण्यासाठी एका खासगी ट्यूशन अकादमीमध्ये शिक्षण घेत होती.

सोमवारी ती नेहमीप्रमाणे ट्यूशनला गेली आणि सायंकाळी ७ वाजता वनाडोंगरी येथील घरी परतली. दरम्यान तिची आई जयश्री आणि वडील अनिल दोघेही बाहेर गेले. तेही काही वेळाने परतले. मात्र वैदेहीची मनःस्थिती बिघडल्याचे त्यांना आढळले. पालकांनी तिला सायंकाळी शालिनीताई मेघे रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी, मानसिक ताणामुळे तिची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. प्रथमोपचारानंतर ती रात्री ११ वाजता तिच्या पालकांसह घरी परतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी आल्यानंतर वैदेही कपडे बदलण्याच्या बहाण्याने झोपण्याच्या खोलीत गेली. बराच उशिरापर्यंत ती बाहेर न आल्याने वडिलांनी भाडेकरूंना बोलावले आणि खोलीचा दरवाजा तोडून ते आत शिरले. त्यावेळी वैदेहीला लटकताना पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश पवार आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वैदेहीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर माने घटनेचा अधिक तपास करीत आहेत.