२४ तासांत १,७२७ बाधितांचा उच्चांक; ४५ मृत्यू
नागपूर : गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात १ हजार ७२७ नवीन बाधितांची भर पडली असून ४५ मृत्यू नोंदवले गेले. नवीन बाधितांमुळे आजपर्यंतच्या बाधितांची संख्या थेट ३५ हजारच्या उंबरठय़ावर पोहचली आहे. येथील एकूण १ हजार १७७ मृत्यूंपैकी ८९५ मृत्यू शहरी भागातील आहेत.
गेल्या २४ तासांत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दगावलेल्या ४५ मृत्यूंपैकी सर्वाधिक ३६ मृत्यू शहरी भागातील, ६ मृत्यू ग्रामीणचे तर ३ मृत्यू जिल्हाबाहेरील व्यक्तींचे आहेत, तर मृत्यूंपैकी सर्वाधिक २८ मृत्यू मेडिकलला तर १५ मृत्यू मेयोत नोंदवले गेले आहेत. दगावलेल्यांपैकी अनेक जण वृद्ध, मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडासह इतर आजाराचे असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे.
या मृत्यूंमुळे येथील एकूण बळींची संख्या थेट नऊशेच्या उंबरठय़ावर गेली आहे, तर ग्रामीण भागात १६९, जिल्ह्य़ाबाहेरील व्यक्तींचे ११३ असे येथील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल १ हजार १७७ मृत्यू आजपर्यंत नोंदवण्यात आहे, तर येथे गुरुवारी २४ तासांत तब्बल १ हजार ७२७ नवीन बाधितांचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यात शहरातील १ हजार ४०९ रुग्ण, ग्रामीणचे ३१५, जिल्ह्य़ाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. नवीन बाधितांमुळे येथील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३४ हजार ४३२ वर पोहचली आहे. त्यात शहरातील २६ हजार ९०९, ग्रामीणचे ७ हजार २२८, जिल्हाबाहेरील २९५ रुग्णांचा समावेश आहे. शहरात रोज नवीन रुग्णांचा उच्चांक नोंदवला जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
परिचारिकेचा मेयोत करोनामुळे मृत्यू
समर्पण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे येथे कार्यरत परिचारिकेचा करोनामुळे मेयो रुग्णालयात मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त कर्मचाऱ्यांनी तिच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करण्यासह दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. या परिचारिकेला समर्पण रुग्णालयात कोविड रुग्णालय म्हणून मंजुरी मिळाल्यावरही उपचार नकारण्यात आल्याचा आरोप आहे. या विषयावर रुग्णालयातील भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांचा क्रमांक देण्यास नकार देत बोलायचे असल्यास शुक्रवारी रुग्णालयात येण्यास सांगितले. भाग्यश्री कोरे असे दगावलेल्या परिचारिकेचे नाव आहे. ती सहा महिन्यांपासून रुग्णालयात सेवा देत होती. कोविड योद्धा म्हणून कोरे यांना मदतीची मागणी करत रुग्णालय परिसरात जोरदार निदर्शन करण्यात आली.
करोनामुक्तांची संख्या २३ हजारांवर
येथील शहरी भागात २४ तासांत १ हजार ८३ तर ग्रामीणला १४३ जण असे एकूण १ हजार २२६ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १७ हजार ६७० वर तर ग्रामीणची ५ हजार २१२ वर अशी एकूण २२ हजार ८८२ वर पोहचली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजार पार
येथील शहरी व ग्रामीण भागातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच दहा हजार पार गेली आहे. त्यात शहरातील ७ हजार १२५ रुग्ण तर ग्रामीणच्या ३ हजार २४८ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील ६ हजार १३३ जणांवर गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यातच सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ५१३ जण दाखल होऊन उपचार घेत आहेत, तर गुरुवारी दुपापर्यंत १ हजार ७२७ जणांवर उपचाराबाबतची प्रक्रिया सुरू होती.
मंत्री सुनील केदार यांना करोना
राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांना करोनाची लागण झाली आहे. ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यातील एकेक मंत्री बाधित होत आहे. अधिवेशनासाठी करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. केदार मंगळवारी मुंबईला गेले होते. तेथे त्यांनी चाचणी केली असता ती सकारात्मक आली. यापूर्वी राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना लागण झाली होती. याशिवाय अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्याचे आमदार पती रवि राणा आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार बाधित झाले आहेत. दरम्यान, केदार यांच्या स्वीय सहायकाने काळजीचे काहीच कारण नाही. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे सांगितले.
एम्सच्या करोना चाचणीचे काम ठप्प
येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या करोना चाचणी प्रयोगशाळेतील सुमारे ३ ते ४ डॉक्टरांनाही करोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील चाचणीचे कामच ठप्प पडल्याने बुधवारी येथे संशयित रुग्णांचे संग्रहित केलेले नमुने तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. यापूर्वी येथील प्रयोगशाळेच्या प्रमुखांनाही करोनाची लागन झाली असून ते गृह विलगीकरणात उपचार घेत आहे, हे विशेष.
सर्वोच्च पदाधिकारीही बाधित
करोनाच्या संक्रमणाने आता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या नागपूर शाखेच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यासह विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांनाही (वरिष्ठ डॉक्टर) आपल्या विळख्यात घेतले आहे. दोघांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी गृह विलगीकरणात त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे.