नागपूर : विंचू, साप, सरड्यासारखे प्राणी बघताच अनेकांचा थरकाप सुटतो. भितीपोटी अनेक लोक किंचाळतात तर अनेक दूर पळून जातात. मात्र नागपूरच्या १९ वर्षीय तरुण या प्राण्यांशी मित्रांसारखा खेळतो. एखाद्या चित्रपटातील गोष्टीसारखी नागपूरच्या या तरुणाची कथा आहे. धंतोली परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय क्रिश गुजरने त्याच्या घरात जणू एक छोटेसे जंगलच तयार केले आहे. यात जॅक नावाचा श्वान, चरमेंडर नावाचा लाल आणि मुफासा नावाचा हिरवा इग्वाना, झुलता टॅरंट्युला कोळी, एक साप….यासह अनेक दुर्मिळ प्राणी आहेत. हे प्राणी त्याचे जीवलग मित्रच आहेत.
कॉकरोचपासून झाली सुरुवात
बी. कॉम.चा विद्यार्थी असलेला क्रिश सार्वजनिक ठिकाणी या आपल्या लाडक्या मित्रांसह फिरताना सहज दिसतो. लहानपणापासूनच क्रिश प्राण्यांच्या सानिध्यात वाढला. आई-वडिलांचे प्राणीप्रेम त्याच्यात उत्तरलं. इतर मुलं जिथे कार्टूनमध्ये रमायची, तिथे क्रिश डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफिकमध्ये गुंतायचा. लॉकडाऊनच्या काळात त्याने ‘एक्झोटिक पेट्स’ या विषयावर गंभीरपणे अभ्यास सुरू केला. काळजी घेण्याच्या पद्धती शिकून घेतल्या. त्याने पहिला प्राणी मेडागास्कर कॉकरोच आणला.
मग मुंबईहून ऑनलाईन दोन टॅरंट्युला, मुफासा नावाचा हिरवा इग्वाना, बेंगळुरूजून २५ हजारांचा कॉर्न साप, ३५ हजारांचा बॉल पायथॉन व नागपुरातून ३० हजारांचा लाल इग्वाना विकत घेतला. आज क्रिशकडे शुगर ग्लाइडर, वेगवेगळ्या रंगांच्या सनकोनूर पक्ष्यांसारखे ७ ते ८ दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आहेत. हे सर्व प्राणी त्याने स्वतः तयार केलेल्या एनक्लोजरमध्ये सुरक्षित आहेत. चॅरमेंडर आणि मुफासा तर इतके घरच्याप्रमाणे आहेत, की ते त्याच्या बेडवर खेळतात, त्याच्यासोबत जेवतात आणि बाहेर फिरायलाही जातात. सुरुवातीला घरच्यांना या प्राण्यांची भीती वाटायची. पण आज त्याची आई त्यांना प्रेमाने जेवण भरवते, तर बहिणी स्वतः त्याला प्राण्यांसाठी जेवण तयार करून देतात. क्रिश बाहेर गावी वा कॉलेजात गेला की घरचे सगळे त्यांची काळजी घेतात, असे तो सांगतो.
कायदेशीर परवानाही क्रिश या दुर्मिळ प्राण्यांना कायदेशीररित्या पाळतो. त्याच्याकडे यासाठीची योग्य कागदपत्रे व परवाने सुद्धा आहेत. एप्रिल २०२३ मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक आराखडा जारी केला होता, ज्यानुसार दुर्मिळ प्राण्यांचे पालन, प्रजनन आणि हस्तांतरण करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक केले. या नियमानुसार क्रिशने नोंदणी केली आहे. या प्राण्यांना योग्य निवासस्थान, आहार आणि पर्यावरणीय परिस्थितीची आवश्यकता असते. ज्याची संपूर्ण काळजी क्रिश घेतो. क्रिश इग्वानाला टरबुज, गाजर, काकडी आणि पालक खायला देतो. सापाला आठवड्यातून एक उंदीर देतो, तर इतर प्राण्यांचे अन्न हे पाळीव प्राण्यांच्या दुकानात किंवा ऑनलाईन मिळते.