काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा विदर्भात दाखल होणार असून त्यात नागपूर ग्रामीणमधून दोन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक गणेशपेठ कार्यालयात पार पडली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

हेही वाचा- चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयी असलेल्या पुस्तकाच्या ‘स्टोरी टेल’ आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

भारत जोडो यात्रा तेलंगणामधून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ७ नोव्हेंबरला प्रवेश करीत आहे. तेथून विदर्भात १५ नोव्हेंबरला यात्रेचे आगमन होत आहे. यात्रेत नागपूर ग्रामीणमधून दोन ते सव्वादोन हजार कार्यकर्ते सहभागी होतील. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून तालुकानिहाय नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यात्रास्थळी पोहोचण्यासाठी बसगाड्या आणि इतर चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागपूर ग्रामीणचे कार्यकर्ते वाशीम जिल्ह्यातील बाळापूर येथे यात्रेत सहभागी होतील. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राजेंद्र मुळक यांनी बैठकीत केले.

हेही वाचा- वन विभागाच्या क्षेत्रातून राहुल गांधींचा मोटारीने प्रवास राहणार , ‘भारत जोडो’ यात्रा १६ व १७ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यात

या बैठकीला आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकर्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, रवींद्र दरेकर, एस.क्यू. जमा, सुरेश भोयर, नाना गावंडे, रश्मी बर्वे, अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, तक्षशीला वाघधरे, संजय मेश्राम, भारती पाटील, शकूर नागानी, प्रकाश वसू, भीमराव कडू, असलम शेख, तुळशीराम काळमेघ, राहुल घरडे, अरुण हटवार, प्रकाश खापरे, अर्चना भोयर, सुनीता ठाकरे, वंदना बालपांडे, मंगला निंबोणे, अनिल राय, विनोद मिसाळ, मिथलेश कनेरे आदी मंडळी उपस्थित होती.