लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : कामाच्या शोधात आलेले दाम्पत्य विटाभट्टीवर मोलमजुरी करीत होते. कामाच्या ठिकाणी त्यांची दोन वर्षीय चिमुकली खेळत होती. दरम्यान, कामावर उपस्थित चालकाने कार मागे घेतली असता त्या चिमुकलीच्या अंगावरुन कारचे चाक गेले. मुलीची किंकाळी ऐकताच आई धावत गेली. तिने कारखाली दबलेल्या चिमुकलीला कवेत घेतले. आरडाओरड केली. मात्र, त्या चिमुकलीचा आईच्या कवेतच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजता कोराडीत घडली. साधना उईके असे मृत चिमुकलीचे नाव आहे. कोराडी पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरादेवी येथे कमल इमले व संजू इमले यांची विटाभट्टी आहे. तेथे अरुण बैसाखू उईके (२५, रा. सोनवारा, जि. शिवनी, मध्यप्रदेश) हे पत्नीसह मजूर म्हणून कामाला आहेत. त्यांना दोन वर्ष वयाची साधना नावाची मुलगी होती. बुधवारी दुपारी अरुण उईके आणि त्यांची पत्नी दोघेही विटाभट्टीवर मातीचा चिखल करत होते. यावेळी, साधना ही त्यांच्या जवळच खेळत होती. विटाभट्टीजवळच आरोपी राजेश हरकू (३५, मूळ गाव शिवणी, मध्यप्रदेश) राहतो. विटभट्टीजवळ उभी असलेली कार (एमएच ४९ सीडी ९९७१) त्याला बाहेर काढायची होती. साधना कारच्या मागे आहे, याची कल्पना नसल्याने राजेशने कार मागे घेतली असता साधना कारखाली दबली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकताच तिच्या आईने कारच्या दिशेने धाव घेतली. कारच्या चाकाखाली चिमुकली दबल्याचे दिसून आले. कार पुढे घेऊन साधनाला बाहेर काढण्यात आले. चिमुकलीला आईने कवेत घेतले आणि तातडीने मेयो रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी साधनाचे वडील अरुण उईके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धात्रक यांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारच्या धडकेत पादचारी ठार

घरापुढे पायी फिरत असलेल्या एका व्यक्तीला भरधाव कारचालकाने धडक दिली. अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला. विजय बाबूलाल मालविय (५८, रा. महादुला टी-पॉईंट, कोराडी) असे मृतकाचे नाव आहे. ३ जानेवारीला रात्री १० वाजता ते घरासमोर फिरत होते. यावेळी, अज्ञात कार चालकाने त्यांना धडक दिली आणि पळून गेला. जखमी विजय मालविय यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी उपचारादरम्यान सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले.