अकोला : जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातून एक धक्कादायक कृत्य समोर आले आहे. एक २५ वर्षीय तरुण गावामध्ये किर्तनात पखवाज वाजवण्यासाठी आला. त्याने गावातील अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर चार महिन्याने अल्पवयीन मुलीला घेऊन तो तरुण पसार झाला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले. अल्पवयीन मुलीच्या अपहृत प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
१९ जुलै रोजी तेल्हारा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला गावातील तरुणाने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान विशेष काही आढळले नाही. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी काही प्रतिष्ठित नागरिकांमार्फत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे मुलीचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना पथक तयार करून समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पीडित मुलीचे पालक, नातेवाईक, गावातील नागरिकांकडे विचारपूस केली.
त्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चार महिन्यांपूर्वी गावातील वारकरी सप्ताहानिमित्त आरोपी प्रदिप दामोदार लासुरकार (वय २५ वर्ष रा. तळेगाव वडनेर, ता. तेल्हारा जि. अकोला) हा सप्ताहामध्ये किर्तन व पखवाज वाजवण्यासाठी गावात आला होता. त्याची अपहृत अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी प्रदिप दामोदर लासुरकार यानेच अल्पवयीन मुलीला पळून नेल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पुणे जिल्ह्यातील रांजणगांव औद्योगिक वसाहत परिसरातील फ्लॅटमधून अटक केली. त्यानंतर त्याला अकोल्यात आणले. पुढील कारवाईसाठी आरोपीला तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी अपहृत मुलीची सुटका केल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस अंमलदार सुलतान पठाण, राज चंदेल, सतीश पवार, राहुल गायकवाड, मनिष ठाकरे आणि सायबर शाखेचे पोलीस अंमलदार गोपाल ठोंबरे यांनी केली. पोलिसांनी कसून तपास केल्याने अपहृत मुलीची सुटका झाली आहे.