३५० निवासी डॉक्टरांना निलंबन नोटीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे सोमवारी मेडिकलमधील शस्त्रक्रियांचे प्रमाण निम्म्याने कमी झाले.  प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला डॉक्टर उपलब्ध करून देण्याची विनंती केली असून आंदोलनकर्त्यां ३५० डॉक्टरांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. मेडिकलमध्ये गेल्या ३६ तासांत एकूण ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या नेहमीच्या तुलनेत जास्त आहे. परंतु प्रशासनाने रुग्णसेवा सुरळीत असून या मृत्यूचा आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

मेडिकलमध्ये सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या मागणीवरून निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून प्रथम बाह्य़रुग्णसेवेवर नंतर रविवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मेडिकलमध्ये काही वार्डात डॉक्टर नसणे, तपासण्या खोळंबणे, मोठय़ा प्रमाणावर शस्त्रक्रिया स्थगित होण्याचे प्रमाण वाढले. रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत मेडिकलमध्ये २४ तासांत तब्बल १९ तर त्यानंतरच्या १२ तासांत (सोमवारी रात्री ८ वा. पर्यंत) १३ मृत्यू नोंदवण्यात आले. मेडिकलमध्ये नेहमी होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.

निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे सोमवारी नागपुरात आले व त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. मात्र, चर्चा फिस्कटल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, मेडिकलमध्ये सोमवारी रात्रीपर्यंत सुमारे ५० सुरक्षारक्षक,१० शस्त्रधारी, १० पोलीस कर्मचारी वाढवण्यात आले. बहुतांश मागण्या मान्य केल्यावरही निवासी डॉक्टर सेवेवर येत नसल्याने अखेर वैद्यकीय संचालकांनी आंदोलनकर्त्यां ३५० निवासी डॉक्टरांना निलंबनाची नोटीस देण्याचे आदेश दिले. या नोटीस मध्ये सोमवारी रात्री ८ पर्यंत डॉक्टर सेवेवर न आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला.

तीन हजारावर रुग्णावर उपचार

मेडिकलमध्ये सोमवारी ३,०९३ रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात तर १६२ रुग्णांवर आकस्मिक विभागात उपचार झाले. येथे २०५ नवीन रुग्णांना दाखल करण्यात आले असून १७ गुंतागुंतीच्या तर १८ किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. सोमवारी मेडिकलमध्ये अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी खूद्द बाह्य़रुग्ण विभागाच्या बालरोग विभागात सेवा दिली.

प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली नाही. उलट न्याय्य मागण्यांकरिता आंदोलन करणाऱ्यांवर निलंबनाची नोटीस बजावली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी मुंबईला बैठक बोलावली आहे. त्यात तोडगा निघाला नाही, तर आंदोलन राज्यभर होईल.

– डॉ. प्रदीप कासवन, प्रतिनिधी, निवासी डॉक्टर, नागपूर.

‘‘निवासी डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सुरक्षा जवानांची संख्या आणि शस्त्रधारी जवानही तैनात केले आहे. संचालकांच्या सूचनेनुसार डॉक्टरांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. सून ते सेवेवर न आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. मेडिकलमध्ये मृत्यू वाढले असले तरी त्याचा आंदोलनाशी संबंध नाही. सर्वत्र पर्याप्त डॉक्टर उपलब्ध आहेत.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 patients died in 36 hours in nagpur government medical college
First published on: 10-10-2017 at 02:06 IST