नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत १ मे २०२३ या दिवसापासून एकूण ३५ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक १४ दवाखाने हे नागपूर जिल्ह्यात असतील. या सर्व दवाखान्यात नि:शुल्क उपचार-तपासणी व औषधांची सोय राहणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने प्रथम मुंबईत ही योजना सुरू केली. आता या योजनेचा राज्यभरात विस्तार होत आहे. त्यानुसार १ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांसह नागपूर शहरात १ असे एकूण १४ दवाखाने सुरू होतील. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतही २१ दवाखाने सुरू होणार आहेत. येथे रुग्णावर औषधोपचार, विविध रक्तचाचण्या आणि औषधही मोफत मिळतील. सध्या मेडिकल, मेयो असो की, आरोग्य विभागाची ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्त चाचणीसाठी शुल्क अदा करावे लागते. आपला दवाखान्यात हा संपूर्ण उपचारच नि:शुल्क राहील. याशिवाय एक्स-रे, सोनोग्राफी या निदान चाचण्यांकरिता संलग्न असलेल्या डायग्नॉस्टिक (निदान) केंद्रांवर स्वस्त दरात तपासणी करण्यात येईल. हे दवाखाने दुपारी २ ते रात्री १० या वेळात सुरू असतील.

हजारी पहाडला प्रस्तावित रुग्णालयाला पाय फुटले?

महानगर पालिका हद्दीतील रुग्णालय पूर्वी हजारी पहाड परिसरात प्रस्तावित होता, परंतु आता ते गोरले लेआऊटमध्ये होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हजारी पहाड येथील नागरिकांकडून रुग्णालयाला पाय फुटले का, हा प्रश्न विचारला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंत्राटी डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर डोलारा

या रुग्णालयात शासनाने एक एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडंट यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येथील सर्व डोलारा कंत्राटी डॉक्टर- कर्मचाऱ्यांवर असणार आहे.