नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ९३८ पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ घेतली जाणार आहे. ४ जानेवारी रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, उमेदवारांना ७ ऑक्टोबरपासून अर्ज भरता येणार आहेत. मात्र या जाहिरातीवरून उमेदवार आणि अनेक विद्यार्थी संघटन मध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. जाहिरातीमधून मोटर वाहन निरीक्षक पदच गायब आहे.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मेगा भरतीची घोषणा केली असताना केवळ ९०० पदांसाठी जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ची जाहिरात प्रसिद्ध केली. या पूर्वी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे गट कअंतर्गत किती पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या ४, कर सहायक पदाच्या ७३, तर लिपिक टंकलेखक पदाच्या ८५२ जागा भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी उमेदवारांना ७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी २९ ऑक्टोबर, तर परीक्षा शुल्क बँकेत भरण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आक्षेप काय ?

कमी जागांसाठी गट-क जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. हजारो जागा रिक्त असताना गट-क संवर्गाची फक्त ९३८ पदांची जाहिरात प्रसिद्ध करून राज्य सरकारने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. परवाच्या अनुकंपा आणि लिपिक पदांच्या नियुक्ती सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले होते “आम्ही हजारो पदांच्या जाहिराती काढणार आहोत”, परंतु आजची जाहिरात त्यांच्या वक्तव्याचा विरोधाभास आहे.
आरटीओ पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत. तरीही आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आले नाही. लिपिक तसेच इतर गट क संवर्गीय पदांच्या हजारो जागा रिक्त असताना फारच कमी जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु जाहिरातीतून मोटर वाहन निरीक्षक पदच गायब आहे. हा संवर्गचं दिला नाही. परिवहन विभागाने तात्काळ रिक्त जागांचे वाढीव मागणी पत्र सामान्य प्रशासन विभागाला पाठवावे. ३३०पेक्षा जास्त मोटर वाहन निरीक्षकांची याच वर्षी पदोन्नती झाली आहे. बाकी पण जागा रिक्त आहेत. ४०० पेक्षा जास्त रिक्त आहेत. – महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशन.