व्यंकटेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे संचालक किशोर हंसराज झाम (६१, रामबाग कॉलनी) यांना फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून नागपूर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड आणि व्यापारी अजय बत्रा (६१) यांनी १ कोटी २७ लाखांची खंडणी उकळली. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>नागपूर :पैसे देण्यासाठी चौकात बोलावले अन् मित्राने घात केला

किशोर झाम हे व्यंकटेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक असून नागपुरात अनेक ठिकाणी त्यांच्या निर्माणाधीन इमारती आहेत. झाम हे गेल्या काही वर्षांपासून ‘क्रिप्टोकरंसी’मध्ये सुद्धा गुंतवणूक करतात. त्यांच्यासोबत आरोपी अजय बत्रा याची मैत्री होती. बत्राचे कळमना परिसरात पेट्रोल पंप आहे. बत्राला ‘क्रिप्टोकरंसी’मध्ये गुंतवणूक करायची होती. त्याने झाम यांना पैसे गुंतवण्यास मदत करण्याची विनंती केली. बत्रा याने झाम यांना जुलै २०२२ मध्ये ‘कॉरबीट’ नावाच्या ‘क्रिप्टोकरंसी’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपये दिले. मात्र, झाम यांनी ती रक्कम खासगी कामासाठी वापरली.

हेही वाचा >>>नागपूर: नागरिकांच्या जीवांशी खेळ?, रेशीमबाग मैदानात झुल्यांचे संचालन चक्क लहान मुलांकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबर २०२२ मध्ये बत्राने झाम यांना रक्कम परत मागितली. मात्र, झाम यांनी त्यांची ३ कोटींचा एक भूखंड बत्राच्या नावावर करून देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि रोख रकमेसाठी ६ महिन्यांची मुदत मागितली. बत्राला रोख हवी असल्याने त्याने कळमनाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड (रा. नांदेड) याची भेट घेतली. २१ डिसेंबरला मारकवाडने झाम यांना फोनवरून अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या झाम यांनी बत्रा याची भेट घेऊन १ कोटी रोख आणि ६ महिन्यात उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवली. मात्र, मारकवाड याने खंडणीच्या स्वरूपात ३० लाखांची मागणी केली. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी झाम यांनी अजय बत्राला १ कोटी रुपये आणि मारकवाड याला २७ लाख रुपये दिले.

यामुळे मारकवाड याला आणखी पैशांचा मोह झाला. तो झाम यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करीत होता. अखेर झाम यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. त्यानुसार इमामवाडा पोलिसांनी बत्रा आणि उपनिरीक्षक मारकवाड यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.