नागपूर: दुर्मिळ आजाराचा रुग्ण असल्यास शासकीय रुग्णालय परस्परांकडे बोट दाखवतात. परंतु नागपुरात एका हिमोफेलिया या दुर्मिळ आजाराच्या मुलावर तीन शासकीय रुग्णालयांनी समन्वयातून यशस्वी शस्त्रक्रिया केली व रुग्णाचे प्राण वाचवले. परंतु अशाच पद्धतीचा समन्वय इतर रुग्णांसाठीही केला जाईल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

अजित शेंडे (वय- १६ वर्षे), रा. चंद्रपूर असे रुग्णाचे नाव आहे. ९ फेब्रुवारीला त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर दुचाकीच्या सायलेंसरवर पायही भाजला. त्यामुळे पायाला जखम झाली. प्रथम स्थानिक व त्यानंतर मोठ्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले. त्यात रुग्णाला हिमोफेलिया बी हा दुर्मिळ रक्तासंबंधित आजार असल्याचे निदान झाले. त्यात रुग्णाची जखम भरत नसतांनाच दुसरीकडे सतत रक्तस्त्रावही होत होता. दहा लाखात एक या पद्धतीचा रुग्ण आढळतो. त्यानंतर रुग्णाला सेवाग्राममधील रुग्णालयात हलवले गेले. तेथे तीन दिवस उपचारानंतरही लाभ होत नसल्याचे बघत त्याला एम्स रुग्णालयात व येथून नागपुरातील मेडिकल रुग्णालयात हलवले गेले.

मेडिकलच्या सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. ब्रिजेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण भिंगारे यांच्या चमूने रुग्णावर उपचार सुरू केले. रुग्णाला वाचवण्यासाठी त्याचा उजवा पाय तातडीने कापण्याची गरज होती.परंतु शस्त्रक्रियेनंतर लागणारे फॅक्टर-९ इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा रक्तस्तराव थांबणे शक्य नव्हते. तातडीने अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी डागा रुग्णालयातील हेमोफेलिया युनिट इन्चार्ज डॉ. संजय देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क साधला. दोघांनीही झटपट फॅक्टर ९ या औषधाची जुळवाजुळव केली. या ५० इंजेक्शन मेडिकलला पोहचल्या. त्यानंतर एम्समधील रक्तविकारतज्ञ डॉ. विश्वदीप यांच्या सूचनेनुसार मेडिकलच्या डॉक्टरांच्या चमूने रुग्णावर शस्त्रक्रिया केली व रुग्णाचे प्राण वाचविले.

यशस्वी शस्त्रक्रियेसाठी सर्जरी विभागातील डॉ. प्रवीण भिंगारे, डॉ. अनुप वाकोडकर, डॉ. प्रदीप शिवसारण, डॉ. पंकज टोंगसे, डॉ. महिमा अद्वैत्या, डॉ. रेवती पूल्लावर, डॉ. शिवलीला होसांगडी डॉ.सिद्धी छजेड, डॉ.प्रणाली पटले, डॉ. युहेश कन्ना व तसेच पॅथॉलॉजिस्ट डॉ. शैलेंद्र जांभुळकर, डॉ. मंजिरी माकडे, डॉ. तृप्ती लाडे, डॉ.संदीप पोराटकर आणि इतर चमूची भूमिका महत्वाची होती.

डॉक्टर काय म्हणतात…

‘ दहा लाखात एखाद रुग्ण या दुर्मिळ आजाराचा आढळतो. गुंतागुंतीची शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांचा पुढाकाराने जिल्हा शल्यचिकित्सकांकडून झटपट इंजेक्शन मिळाले. त्यामुळे रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. लवकरच त्याला सुट्टीही मिळेल, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.