नागपूर : कामाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे चिडलेल्या ठेकेदाराने एका हॉटेलमालकाला धडा शिकविण्यासाठी कट रचला. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले व पोलिसांडून कारवाई करायला भाग पाडले. आरोपींनी मालकाच्या हॉटेलमध्ये बोगस शासकीय स्टॅम्प ठेवून पोलिसांना माहिती दिली. अटकेत असताना हॉटेलमालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

अक्षय अश्विन लिम्बना (वय ३९, माऊंट रोड, सदर) असे अडकविलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांचे माऊंटरोडवरील नवरत्न राघव हे हॉटेल आहे. ४ एप्रिल रोजी पोलिसांनी नवरत्न राघव या हॉटेलमध्ये छापा घालून अनेक बोगस स्टॅम्प जप्त केले. पोलिसांनी अक्षय यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अक्षय अटकेत असताना ७ एप्रिल रोजी त्यांनी त्यांच्या कार्यालयातील विविध बॅंकांचे धनादेश चोरी गेल्याचे तसेच ते वटविण्याचे प्रयत्न झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यावरून सेंट्रल एव्हेन्यू येथील इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंक येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सत्तार कुतीबुद्दीन अन्सारी (४२, भांडे प्लॉट, उमरेड मार्ग) असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बदला घेण्यासाठी रचला कट

अक्षय लिम्बना यांनी हॉटेलचे नुतनीकरण केले. तसेच माऊंट रोडवरील बांधकाम केले. याचा ठेका सत्तारला दिला होता. त्याने काम करुन दिले. मात्र, त्याला अक्षयने पैसे वेळेवर दिले नाही. त्यामुळे सत्तारकडे काम करणारे कामगार कामाला यायला तयार नव्हते. यामुळे सत्तारने पंकज रहांगडाले याच्यासोबत मिळून अक्षय यांना अडकविण्याचा कट रचला व खोटे स्टॅम्प रेस्टॉरेन्टच्या स्वयंपाकघरात ठेवले. त्याने पंकजच्या साथीने चोरलेल्या धनादेशांवर बोगस स्वाक्षरी करत ते वटविण्याचा प्रयत्न केला. त्यातच तो अडकला. पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला असून पंकजचा शोध सुरू आहे.

धनादेशावर खोटी स्वाक्षरी

अन्सारी याने लिंम्बना यांच्याजवळील काही धनादेश चोरी केले होते. स्टॅप प्रकरणात लिम्बना यांना अटक झाल्यानंतर अन्सारी याने लिम्बना यांची खोटी स्वाक्षरी करत बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

बनावट स्टॅप बनविले कुठून?

अंन्सारी याच्यावर चोरी, जबरी चोरी, दुखापत करुन जबरी चोरी, अग्निशस्त्र बाळगणे, शस्त्र बाळगणे आदी बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. दरम्यान, अन्सारीने शासकीय कार्यालयाचे बनावट स्टॅप कुठून तयार केले, याबाबचा पोलिस शोध घेत आहेत.