अमरावती : अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे, ज्यापैकी जवळपास तीन हजार चौरस किमी क्षेत्रात खाऱ्या पाण्याची समस्या आहे. या समस्येवर मात करून शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोडे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बोराळा गावात प्रायोगिक प्रकल्‍प राबविल्‍या जात असून हा प्रयोग यशस्‍वी झाल्‍यास खारपाणपट्ट्यात अशा प्रकारचे ९४० बंधारे बांधले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दर्यापूर तालुक्‍यातील बोराळा येथे दिली.

या प्रायोगिक प्रकल्‍पाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली, त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना या प्रकल्‍पाची माहिती दिली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, प्रकाश भारसाकळे, बळवंत वानखडे आदी उपस्थित होते.भूगर्भशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनात हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. बोराळा गावात एका नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे. या नाल्यासह एक मोठे शेततळे तयार करण्यात येत आहे, ज्यामध्ये ९ कोटी ४० लाख लिटर पावसाचे गोड पाणी साठवण्यात येणार आहे. जमिनीपासूनच्या पहिल्या वाळूच्या थरातून अंदाजे ३ कोटी लिटर खारे पाणी बाहेर काढून फेकले जाईल, ज्यामुळे ९ कोटी लिटर पाणी बंधाऱ्यात थांबेल व ३ कोटी लिटर पाणी वाळूच्या थरात जाईल. बोराळ्याच्या या एका प्रायोगिक प्रकल्पामुळे अशा एकूण १२ कोटी लिटर गोड पाण्यावर ४० हेक्टर म्हणजेच १०० एकर जमिन बारमाही ओलिताखाली येईल. ठिबक सिंचनाचा प्रयोग केला, तर २०० एकर जमिनीला बारमाही गोड पाणी उपलब्ध होईल, या एका प्रकल्‍पासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणतात आंदोलन करा, मी पाठिंबा देतो; काय आहे समस्या, वाचा…

याशिवाय शेततळ्यांमध्‍ये झिंगेपालनाचा प्रयोग देखील यशस्‍वी होऊ शकतो. राजस्‍थानातील चुरू या जिल्‍ह्यात खाऱ्या पाण्‍यातील झिंगेपालनाचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे. या भागात तलाव बांधून शेतकऱ्यांना झिंगेपालनाचा व्‍यवसाय देखील करता येऊ शकेल. वने व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याशी चर्चा करून योजना तयार केली जाईल. या भागातील झिंगे निर्यात होऊ शकतील आणि शेतकरी समृद्ध होईल, असे गडकरी म्‍हणाले.

हेही वाचा >>>नागपूर : पतीच्या स्मृतीदिनी मृत पत्नीचे अवयवदान; तीन रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पूर्ण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूसंपादन नाही, स्थलांतर नाही तसेच पुनर्वसनही नाही त्यामुळे खर्च कमी असेल. प्रकल्पामुळे खारपाण पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल व शेतीसाठीही मुबलक प्रमाणात गोड पाणी उपलब्ध होईल, असे सुरेश खानापूरकर यांनी सांगितले. तीन जिल्‍ह्यांतील सुमारे ४ लाख ६९ हजार २०० हेक्टर खारपाण पट्ट्यातील जमिनीवर असे ९४० बंधारे बांधले, तर मुबलक प्रमाणात बारमाही गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती खानापूरकर यांनी दिली.